समाजाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना आपल्या कुटुंबापासून आणि गावापासून दूर राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत आपल्या गुरूंचा सत्कार करून गुरु-शिष्याच्या नात्याला अनोखा सन्मान दिला.
कै. रा. क. काकांनी कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव भुईकोट किल्ला येथील प्राध्यापक श्री. धनंजय कौतिकराव निकम यांचा ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी व स्नेही पोलिस कर्मचाऱ्यांनी पुष्पहार, शाल, बुके व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार केला.
“परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्” या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत रात्रंदिवस जनतेच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी तत्पर असणारे भावी PSI श्री. मुंजाजी ढोणे, श्री. केशव सांगळे, श्री. निखिल नागरगोजे तसेच SRPF जवान श्री. राजू सोनटक्के यांनी आपल्या गुरूंच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण ठेवत हा सत्कार केला.
कर्तव्याच्या निमित्ताने दूरवर राहूनही आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरूंची आठवण ठेवणे, त्यांचा सन्मान करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे ही या सत्काराची विशेष बाब ठरली. या पोलिस कर्मचाऱ्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करण्याबरोबरच आपल्या गुरूंबद्दल असलेला आदर आणि कृतज्ञताही कृतीतून व्यक्त केली.
या प्रसंगी प्रा. धनंजय निकम यांनी सत्काराबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी गुरू म्हणून केलेला हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि भावनिक क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दूरवरच्या सेवेत कार्यरत असूनही आपल्या गुरूला विसरले नाहीत, उलट शिक्षक दिनी त्यांचा सन्मान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गुरूंच्या संस्कारांची आठवण ठेवत कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांनी जपलेला हा गुरु-शिष्याचा ऋणानुबंध निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.
