मालेगाव : स्पायका ग्रुप ऑफ एनर्जीच्या रावळगाव साखर कारखान्याकडून थकीत ऊस उत्पादकांचे देयके तात्काळ अदा करण्यात यावीत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनानुसार, सन २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी त्यांनी रावळगाव येथील स्पायका ग्रुप ऑफ एनर्जी या खासगी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे. कारखान्याकडून ऊस तोडणी व वाहतुकीनंतर त्याची पावती शेतकऱ्यांकडे असतानाही, ऊस पुरवठ्याला दहा महिने उलटूनही संबंधित ऊस बिलाची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासन नियमानुसार ऊस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपीप्रमाणे ऊस बिल अदा करणे बंधनकारक असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच विलंब झाल्यास व्याजासह देय रक्कम मिळण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
थकीत देयकांमुळे पुढील हंगामातील मशागत, बियाणे, खते आणि शेतीच्या इतर खर्चासाठी शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत कारखाना प्रशासनाकडे वारंवार तोंडी तसेच लेखी मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान, तहसीलदार विशाल सोनवणे यांनी उपोषणस्थळी शेतकऱ्यांची भेट घेतली. तहसीलदारांनी रावळगाव साखर कारखान्याचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांची प्रलंबित देयके तात्काळ अदा करण्याबाबत चर्चा केली.
कारखाना व्यवस्थापनाकडून प्रलंबित ऊस देयके अदा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
आता कारखाना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार थकीत ऊस बिलांची रक्कम प्रत्यक्षात कधी अदा केली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.