चाळीसगाव (जय योगेश पगारे) तालुक्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. त्यामूळे मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफ ला पाचारण करण्यात येणार असून याबाबतची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. डोंगरी आणि तितुर नदीला पूर आल्याने चाळीसगाव शहरात नदी-नाल्यांचे पाणी नागरी वस्त्या आणि बाजारपेठांमध्ये शिरल्याने हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रात्रीपासूनच प्रशासनाने मदतकार्य सुरू असले तरी आता बर्याच ठिकाणी स्थिती गंभीर बनल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणावरून नागरिकांना सुरक्षितपणे काढण्याची आवश्यकता भासत आहे. या अनुषंगाने तहसीलदार अरूण मोरे आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राज्य आपत्ती निवारण विभागाकडे एसडीआरएफच्या दलास पाचारण करण्यात यावे अशी मागणी केली होती.
जिल्हा प्रशासनाची ही मागणी आता मान्य करण्यात आली असून मंत्रालय निवारण कक्षातील अवर सचिव अ.स. फडतरे यांनी धुळे येथील राज्य राखीव दलाच्या महासमादेशकांना निर्देश देऊन चाळीसगाव तालुक्यात मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार आता एसडीआरएफची टीम मदतकार्य करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- पाटणादेवी परिसरात मुसळधार पाऊस :- चाळीसगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या पाटणादेवी परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. परिसरातून गिरणा नदी वाहते. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाटणादेवी परिसरातील पाच गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या गावांमधील वीज पुरवठा देखील खंडीत झाला आहे.
- नगरदेवळा स्टेशनवरील पुलांचे कठडे गेले वाहून :- नगरदेवळा गाव व नगरदेवळा स्टेशनला जोडणाऱ्या नव्या पुलाला देखील पुराचा फटका बसला आहे. तितूर नदीला आलेल्या पुरामुळे नगरदेवळा गावांचा संपर्क परिसराशी तुटला आहे. पाण्याचा जोर इतका भयंकर होता की, पुलाचे कठडे वाहून गेले.
- नगरदेवळा अग्नावंती मध्यम प्रकल्पात ३१.३७% पाणीसाठा :- मागील काही तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नगरदेवळा अग्नावंती मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे . आज सकाळी सात वाजेपर्यंत प्रकल्पात ३१.३७ % पाणीसाठा झाला असून पावसाची आवक बघता सायंकाळपर्यंत धरण ५०% किंवा अधिक क्षमतेने भरण्याचा अंदाज आहे.
अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे
उत्तर द्याहटवा