गणेश आढाव/देवळा प्रतिनिधी
देवळा, ता. १८ (जि. नाशिक) : देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील उमराणे येथील परसुल धरण शिवारात नाशिक ग्रामीण अधीक्षक यांनी तयार केलेल्या रणरागिणी पथकाने आज दुपारी २ वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना संशय आल्याने खाली उतरून पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना जमिनीत पुरलेल्या काही गावठी दारूच्या हातभट्ट्या आढळून आल्या. त्या ठिकाणी सदर पथकाने कारवाई करत ५० हजार रुपये किमतीचा गावठी दारूचा मुद्देमाल व दारू निर्मितीस लागणारे साहित्य नष्ट केले.
या रणरागिणी पथकातील पोलीस महिला पोलीस हवालदार सोनाली सुदाम केदारे यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात दारूबंदी कायदा(कलम ६५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात झालेल्या या कारवाईमुळे गावठी दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून महिला रणरागिणी पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या पथकात महिला पोलीस हवालदार सोनाली केदारे यांच्यासह महिला पोलीस नाईक सत्यभामा सोनवणे, महिला पोलीस शिपाई अश्विनी परदेशी, राजश्री अहिराव, संध्या पवार, पोलीस शिपाई विलास सूर्यवंशी, चालक पोलीस शिपाई ज्ञानेश्वर पानसरे यांचा समावेश होता.
तालुक्यात झालेल्या या कारवाईमुळे गावठी दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून महिला रणरागिणी पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे