सटाणा, ७ जानेवारी २०२४:
बागलाणसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा यात्रा उत्सव रविवार दि. ७ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. दरवर्षी महाराजांचा यात्रा उत्सव त्यांच्या पुण्यतिथी दिनापासून म्हणजेच मराठी महिन्यातील मार्गशीर्ष वद्य एकादशी (सफला एकादशी) या दिवसापासून सुरु होतो.
दरवर्षी साजरा होणाऱ्या पुण्यतिथी उत्सवसाठी कै. भिकाजी रतन जगताप (भिका मिस्तरी) यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावून सागवानी लाकडापासून एक भव्य दिव्य असा १५ फुट उंचीचा सुंदर रथ सन १९२१ या साली तयार केला. हा रथ बनवितानाचे वैशिष्ट्य म्हणजे भिका मिस्तरी यांनी आपल्या पायाचा स्पर्श होऊ न देता हा सुंदर रथ तयार केला. प्रथम त्यांनी रथाचा संपूर्ण गाभारा खाली तयार करून मग नंतर गवंडी लोकांसारखे पालक तयार करून रथाचा वरील भाग तयार केला. पण रथाला आपल्या पायाचा स्पर्श होऊ दिला नाही. रथाच्या पुढील चाकाचे फाऊंडेशन इतके अप्रतीम आहे की रथ बारा फुटाच्या आतच वळण घेऊ शकतो. हा रथ बनवायला एकूण तीन वर्षाचा काळ लागला. सन १९२१ पासून ह्या रथात मिरवणुक निघण्यास प्रारंभ झाला. व आजपर्यंत ही परंपरा टिकून आहे.
दरवर्षी रथ मिरवणुक बघण्यासाठी जवळपास २ ते ३ लाख भाविक सटाण्यात दाखल होतात. महाराजांची रथातून भव्य मिरवणुक दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत काढण्यात येणार आहे. रथ मिरवणुकीसाठी बागलाणसह परिसरातील अनेक बँडपथक, ढोलपथक, लेझीम, टिपरी नृत्य, आदिवासी नृत्य, नंदी, घोडा नृत्य, भजनी मंडळ असे अनेक पथके विनामूल्य सेवा देणार आहेत. त्यामुळे रथमार्गावर गर्दी होऊ नये म्हणून रथमार्गावरील अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. तसेच मिरवणुकी दरम्यान काही विचित्र घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ही मागविण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या तीन अँबुलन्स ही कार्यरत राहणार आहेत. तसेच मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदा प्रथमच रथाला चारही बाजुनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. रथमार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेसह भव्य स्क्रीन देखील बसविण्यात आली आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी सटाण्यातील रथमार्गावर विविध मित्रमंडळांकडून चहा व नाश्त्याची विनामूल्य सेवा करण्यात आली आहे.
मिरवणुक वेळेत रथमार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात आलेली असल्याने मिरवणुक बघण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांनी आपली खाजगी वाहने गावाबाहेरील मोकळ्या पटांगणांवर पार्किंग करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
**अशी असणार रथ मिरवणुक**
दुपारी ४ वाजता मिरवणुकीस प्रारंभ
४ ते ४:३० दरम्यान रथ राममंदीर परिसरात राहणार.
४:३० ते ५:०० दरम्यान कॅप्टन अनिल पवार चौकात.
५ ते ६ दरम्यान दत्तमंदीर भगवा चौक परिसर.
६ ते ६:३० दरम्यान सरकारी दवाखाना परिसर.
६ :३० ते ७: ३० दरम्यान यश कलेक्शन शिवाजी रोड परिसर
७:३० ते ८ चव्हाण कॉम्प्लेक्स परिसर