मालेगाव, दि. ०७ जानेवारी २०२४ : मालेगाव शहरात पोलीस व पत्रकार यांच्यातील संबंध आणि संवाद दृढ होऊन आणखी चांगल्या प्रकारे समाजासाठी काम करता येईल या उद्देशाने शनिवारी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या कल्पनेतून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील सुसंवाद हॉल येथे आयोजित या कार्यक्रमात पोलीस व पत्रकार यांच्यातील ऐक्य, सद्भाव आणि विश्वासाची भावना वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पत्रकारांचा पुष्पगुच्छ, डायरी, पेन देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांना अल्पोपहार देऊन निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, सूरज गुंजाळ, मालेगाव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत शुक्ला, उर्दु मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जहुर खान उपस्थित होते.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती म्हणाले की, पोलीस व पत्रकार हे समाजाचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. पोलिसांनी समाजात कायद्याचा राज आणि सुव्यवस्था राखण्याचे काम केले पाहिजे. तर, पत्रकारांनी समाजाला माहिती देऊन समाजातील समस्यांचे निराकरण करण्यास मदत केली पाहिजे. पोलीस व पत्रकार यांच्यातील संबंध आणि संवाद दृढ झाल्यास समाजात कायद्याचा राज आणि सुव्यवस्था राखणे सोपे होईल.
कार्यक्रमात मालेगाव शहरातील मराठी व उर्दु माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी पोलीस दलाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.