शहरातील छावणी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून जबरीने मोबाईल हिसकावणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ३ घटनेतील ५ आरोपीतांकडून ३ मोटार सायकलसह १६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी फिर्यादी मुजाहीद अहमद शकील अहमद यांना त्यांच्या मोबाईलवर बोलत असताना दोन अज्ञात तरुणांनी जबरीने मोबाईल हिसकावून पळून गेले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी फिर्यादी आशुतोष बाळु दिवरे यांच्याकडूनही त्यांच्या मोबाईलवर बोलत असताना दोन अज्ञात तरुणांनी जबरीने मोबाईल हिसकावून पळून गेले. याप्रकरणी देखील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोन्ही गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पोलीस अधिक्षक नाशिक ग्रा. श्री शहाजी उमाप यांनी छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.व्हि. शेगर यांना आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शेगर यांनी पोलिस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी व सचिन चौधरी यांच्यासह गुन्हे शोध पथकाला तपासासाठी नियुक्त केले.
तपासादरम्यान पोलिसांना गुन्हेगारांचा मागोवा लागला आणि अवघ्या ३-४ तासात त्यांनी ५ आरोपी व एक विधिसंघर्ष बालक यांना अटक केली. या आरोपींकडून गुन्ह्यातील मोबाईल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी, सचिन चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भुषणर, भरत गांगुर्डे, पोलीस नाईक प्रसाद देसले, कैलास चोथमल, शांतीलाल जगताप, विलास बागळे, किरण पाटील, पोलीस शिपाई संदिप राठोड व राम निसाळ यांचे विशेष योगदान राहिले.
पोलीस अधिक्षक श्री उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक श्री भारती, सहा. पोलीस अधिक्षक कॅम्प श्री सुरज गुंजाळ यांनी या कारवाईचे कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ज्यांचे मोबाईल हरवले आहेत किंवा चोरी झाले आहेत त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या बीलसह छावणी पोलीसांसोबत संपर्क साधावा असे आवाहन छावणी पोलिसांनी केले आहे