मालेगाव, दि. २१ डिसेंबर २०२३: मालेगाव शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनात अवैध गॅस भरून विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हसन अब्दुल रौफ (वय ३७, राहणार घर नं. १५२, ग.नं. १४, नयापुरा) आणि शेख राशिद शेख मजीद (वय २९, राहणार घर नं १६४५, ग.नं ०२, गुलशने इब्राहिम) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक शहाजी उमाप आणि अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या सुचनेनुसार, विशेष पथकातील पथक प्रमुख पोउनि अनिल पठारे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गल्ली नं १५. सुलेमानी मस्जिदच्या पाठीमागे, मदरसावाली गल्ली, नयापुरा येथे काही इसम बेकायदेशीरपणे अवैध सिलेंडर बाळगुन इलेक्ट्रीक मोटरच्या साहाय्याने वाहनामध्ये गॅस भरून विकी करत आहेत. या बातमीची खात्री करून पोलिसांनी छापा टाकला असता, मोहम्मद हसन अब्दुल रौफ हा अवैध गॅस सिलेंडर असुरक्षितरित्या ठेवून रिक्षा चालक शेख राशिद शेख मजीद याच्या रिक्षामध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक भारतगॅस कंपनीचे सिलेंडर, बॅटरी, इलेक्ट्रीकवर चालनारी मोटर, पिस्टन, वजन काटा असे एकुण १,२७,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींवर आझादनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.