📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू ; ग्रामीण पोलीस दलातर्फे मासरेडचे आयोजन

मालेगाव - योगेश पगारे 

 नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आज रोजी ग्रामीण पोलीस दलातर्फे मास रेडचे आयोजन करण्यात आले होते.

आज दिनांक ०६ ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणा-या एकूण ३१ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून सुमारे ५,४७, ९२५/- रुपये किं.ची तयार गावठी दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त करून ३७ इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली ३१ गुन्हे दाखल केले आहेत.

या धाडसत्रात जिल्ह्यातील जायखेडा मधील ८, सटाणा मधील ४, वाडीव-हे, इगतपुरी, मालेगाव तालुका मधील प्रत्येकी ३, कळवण २, घोटी, पेठ, सायखेडा, देवळा, सुरगाणा, नांदगाव, चांदवड, मालेगाव किल्ला मधील प्रत्येकी १ ठिकाणांचा समावेश आहे. यात जिल्हयातील डोंगर-द-या, नदी-नाल्यांच्या लगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्ट्यांवर छापे टाकून पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हस्तगत केली आहे.

सदर मास रेड दरम्यान पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी स्वतः सहभाग घेवून शीघ्रकृती दलाचे जवानांसह चांदवड तालुक्यातील वडबारे शिवारात गणेशा डोंगराचे पायथ्याशी छापे टाकून अवैधरित्या गावठी दारूची गाळप करणा-या इसमांवर कारवाई केली आहे.

जिल्हयातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय तसेच ०८ विशेष पथकांच्या मदतीने जिल्ह्यातील वेगवेगळया ठिकाणी चालणा-या अवैध व्यवसायांवर धडक कारवाया करण्यात येत आहेत.

नागरिकांनी आपल्याकडील उपयुक्त माहिती अवैध व्यवसाय विरोधी हेल्पलाईन क्रमांक ६२६२ २५ ६३६३ यावर व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून द्यावी, माहिती देणा-याचे नांव देखील विचारण्यात येणार नाही. जिल्हयातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे निर्मूलन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने