मालेगाव तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे गावानजीक इको गाडीच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सोमवार दि.२० रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. यात इमरान शेख करीम शेख वय ३० रा.सिद्दीकी नगर, मालेगांव, गुलाब शामसिंग सोनवणे वय ७० रा. हेंद्रून धुळे तसेच एक अनोळखी असा तिघांचा जागीच मृत्यू झाला तर वाहन चालक व अन्य प्रवाशी हे जखमी झाले असून त्यांना मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सदर इको गाडीला टँकरने मागून ठोस दिल्याने सदर अपघात झाल्याची चर्चा असली तरी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर गाडी पलटी झाल्यानेच अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात ग्रस्त गाडी ही मालेगाव तालुक्यातील राजमाने येथील असून नाशिक येथून परतीच्या प्रवासात या गाडीला अपघात झाला. यात वाहन चालकासह अन्य चार प्रवासी देखील होते.