मालेगाव (जय योगेश पगारे) मालेगाव शहरात आज दुपारपासून पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडला असून या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एकाच वेळी तब्बल पंधरा जणांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची धक्कादायक आज घटना घडली आहे या कुत्र्याच्या चाव्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दुपारपासून मालेगावातल्या सोयगावचा मळी भाग, इंदिरानगर चव्हाण नगर, पारिजात कॉलनी, दौलती शाळेचा परिसर, कृषी नगर आदी भागातील नागरिकांना रस्त्यावर फिरणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेण्याचे सूत्र सुरू केले, त्यानुसार त्याने तब्बल पंधरा जणांना जखमी केले असून सर्वांना सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे लागले, प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार सदर कुत्रा लाल रंगाचा असून त्याचे तोंड इतर कुत्र्यांपेक्षा मोठे आहे व परिसरातील अनेक भटकी कुत्री त्याला पाहून त्याच्यावर भुंकत होते, या पिसाळलेल्या कुत्र्याने वृद्ध, महिला व मुलींना चावा घेतला असून त्यांच्या जखमा खोलवर आहेत.
सामान्य रुग्णालयातील आकडेवारीनुसार आज रात्री 9 वाजेपर्यंत पंधरा जणांनी येऊन उपचार घेतले.
तर दुसरीकडे श्वान दंशाच्या अनेक घटना मालेगावात घडत आहेत, गेल्या पाच दिवसात
तब्बल तेहतीस जणांना व आज पंधरा जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे
सदर कुत्रा अजूनही मोकाट असून परिसरातील नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन मालेगाव लाईव्ह तर्फे करण्यात येत आहे.
महापालिकेने या कुत्र्याचा बंदोबस्त करून इतर भटक्या कुत्र्यांना ही उचलून न्यावे अशी मागणी संतप्त नागरिक करत आहे
दुसरीकडे ही धक्कादायक घटना महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. बेवारस वा भटक्या कुत्र्यांचा विषय हा तसा सर्वव्यापी चिंतेचा बनला आहे. प्राणीमात्रांवर दया करणे वेगळे अन् सरसकट कोणत्याही भटक्या वा पिसाळलेल्या जनावरांना संरक्षण देणे वेगळे. दुर्दैवाने अलिकडे हे फॅडही जोमात आहे. भूतदयेच्या नावाखाली ही जमातही शेफारली असून त्याचा फटका अबालवृद्धांना असा बसतो आहे. प्रशासनाने याबाबत अधिक दक्ष राहून या प्रकारांना पाळणे गरजेचे आहे
कुत्रा पिसाळला म्हणजे काय? कुत्र्याला रेबीजची बाधा कुठून होऊ शकते?
रेबीजचे विषाणू हे लाळेवाटे पसरतात. जर कुत्रा दुसर्या कुठल्या रेबीज झालेल्या प्राण्याच्या (कुत्रा वा मांजर) यांच्या संपर्कात आला आणि त्या प्राण्यांनी कुत्र्याचा चावा घेतला तर, त्याच्याही शरीरात रेबीजचे विषाणू शिरतात आणि त्यालाही रेबीज होतो.
रेबीजमुळे बाधीत प्राण्याच्या वा मनुष्याच्या मेंदू आणि मज्जारज्जू (spinal cord) वर परिणाम होतो. आणि त्यामुळेच त्याच्या वागणूकीत एक भितिदायक असा आक्रमकपणा दिसून येतो. ज्यालाच आपण पिसाळला असे म्हणतो.
रेबीज झालेला प्राणी वा मनुष्य हा २ ते ८ आठवड्यापर्यंत लक्षणरहीत (asymptomatic) असू शकतो. आणि हाच काळ अत्यंत धोकादायक असतो. कारण लक्षणे तर दिसत नाहीत परंतु लाळेत मात्र रेबीजचे विषाणू असतात, जे सहजपणे इतरांकडे संक्रमीत होऊ शकतात.
एकदा रेबीजची लक्षणे दिसू लागल्यावर मात्र कुत्रा ५-६ दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही.
पिसाळलेला कुत्रा चावल्यावर काय करावे? सर्वप्रथम जखम नीट, स्वच्छ धुवून घेऊन त्यावर जंतुनाशक (आयोडिन इत्यादी) लावावे. जेणेकरून रेबीजचे विषाणू नष्ट होतील वा पसरणार नाहीत. आणि त्यानंतर मात्र ताबडतोबीने डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करून घ्यावेत.
तुमच्या पाळीव श्वानास रेबीज होऊ नये म्हणून काय करावे?
तर त्यास दरवर्षी नेमाने anti rabies vaccine देत रहावे आणि त्याची व्यवस्थित नोंद ठेवत रहावी, तरच तुम्ही आणि इतर सुखरूप राहू शकाल. एक जागरूक श्वान पालक म्हणून ते आपले कर्तव्यच आहे.