नांदगाव (मनोहर शेवाळे) नांदगाव,मनमाड परिसरात पावसाने रात्री जोरदार तडाखा दिल्याने नांदगाव शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे,
पावसाचे पाणी नांदगाव रेल्वे स्थानकात घुसल्याने रेल्वेचे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. रेल्वे रुळावर जवळपास दोन फुटाच्या वरती पाणी साचल्याने त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला त्यामूळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
रात्री अनेक प्रवाशी गाड्या मनमाड व चाळीसगाव रेल्वे स्थानकावर उभ्या करण्यात आल्या होत्या त्यामुळे अनेक प्रवाशी अडकून पडले होते. मध्यरात्रीनंतर धिम्या गतीने रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आल्याने रेल्वेच्या प्रवाशी गाड्या उशिरा धावत होत्या. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळावरील पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे