औरंगाबाद शहरातील संजयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते देवराज वीर यांना नातेवाईक महिलेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. 2) दुपारी साडेतीनच्या सुमारास रामनगर येथे आरोपी महिला जनाबाई जाधव व सविता पगारे या दोन्ही पाच वर्षाच्या मुलाला मारहाण करीत होत्या. ही माहिती समजताच वीर यांनी त्यांच्या तावडीतून चिमुकल्यांची सुटका केली. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी दोन्ही महिलांना पीडित मुलांसह पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्या ठिकाणी बालकल्याण संरक्षण कक्षाच्या महिला अधिकारी ऍड. सुप्रिया इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बाजारे, कैलास पंडित यांनी पीडित मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली.
चिमुकल्यांनी सांगितले की, 'आरोपी महिलांनी भीक मागण्यासाठी आम्हाला विकत आणले आहे. भीक मागण्यासाठी नकार दिल्यास त्या आम्हाला मारहाण करीत होत्या. यानंतर वीर यांच्या फिर्यादीवरून दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोघींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत बराटे करीत आहेत.
लाकडी पट्टीने बेदम मारत होत्या..
मुकुंदवाडी परिसरातील रामनगर येथील रहिवासी कांताबाई खंडागळे यांनी जनाबाई उत्तम जाधव ही महिला तिच्या घरात असलेल्या लहान मुलांचा अमानुषपणे छळ करत असल्याचे वारंवार पाहिले होते. बुधवारी रात्री त्यांनी समाजसेवक देवराज वीर यांना फोन करून जनाबाई लहान मुलास क्रूरपणे मारहाण करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर देवराज वीर घटनास्थळी पोहोचले. तेव्हा जनाबाई आणि तिची मुलगी सविता संतोष पगारे या दोघी एका मुलाला लाकडी पट्टी आणि हाताने मारत होत्या. हृदय पिळवटून टाकणारा हा प्रकार पाहून वीर यांनी पाच वर्षाच्या मुलास त्यांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर पोलिस कर्मचारी खान यांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या दोन महिला आणि मुलांना मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेले.
पोलिसांनी आरोपी महिलांची चौकशी केली असता, त्यांनी पाच वर्षाच्या मुलाला 50 हजारात आणि जालनाच्या दोन वर्षाच्या मुलाला एक लाख रुपयांमध्ये त्यांच्या आई-वडिलांकडून विकत घेतल्याची माहिती त्या महिलेने दिली. मुलांना विकत घेतल्याचा लेखी करारही शंभर रुपयाच्या बॉंडपेपरवर झाला असल्याची माहिती आरोपी महिलांनी पोलिसांना दिली आहे. पोलिस बॉंड वरील साक्षीदाराला सह यात आरोपी आणखी कोणी आहे का? याचा पुढील तपास करीत आहेत.