मुंबई, 10 जून : सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे मालाडमधील एका 3 मजली चाळीचा काही भाग कोसळल्याची दुदैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील 6 मुलांसह 9 जणांचा करुण अंत झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मालाड पूर्व मधील मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. रात्रभर शोधकार्य सुरू होते. या चाळीत राहणाऱ्या राफिक यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. राफिक यांच्यासह त्यांची पत्नी रईसा बानो आणि घरातील 6 चिमुरडे ढिगाराखाली सापडले. तर राफिक यांचा भाऊ आणि त्याची पत्नीसुद्धा ढिगाराखाली अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. राफिक यांच्या कुटुंबातील 6 चिमुरड्यांचा यात मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील एकूण 9 जणांचा या दुर्घटनेमध्ये करुण अंत झाला.
साभार :लोकमत