📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

श्री.स.अहिरे विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवावी - संजय पवार (पोलीस उपनिरीक्षक, वडनेर खाकुर्डी.)

(प्रतिनिधी - दिनेश पगारे) : सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात *हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी तेजस्वी राजमाता माँ जिजाऊ साहेब व "उठा जागे व्हा आणि ध्येया पर्यंत पोहचत नाही तो पर्यंत थांबु नका. "* तरुणांना स्फूर्ति देणारा एक चिरंतन झरा. युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त  संजय पवार ( पोलीस उपनिरीक्षक वडनेर खाकुर्डी पो.स्टे ) यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. तसेच शालेय समिती अध्यक्ष अतुल ( नाना ) नरेंद्र अहिरे यांनी माँ साहेब राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. 
       याप्रसंगी माँ साहेब जिजाऊंच्या वेशभुषेत कुमारी गौरी हयाळीज हिने मी जिजाऊ बोलतेय या विषयी त्यांच्या कार्याची महती सांगितली, तसेच कुमारी दिव्या अहिरे हिने देखील माँ साहेब जिजाऊंच्या कार्यकतृत्वाविषयी सविस्तर माहिती दिली. कुमार दुर्गेश जाधव व कुमारी येता चव्हाण यांनी युवा दिना निमित्त व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर माहिती दिली.
     विद्यार्थी जीवन जगतांना शिस्तीचे पालन करून अभ्यास करावा व यश संपादन करावे. आपल्या आई - वडिलाचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे. शालेय जीवनातच आपल्या जीवनाची दिशा ठरवावी त्यानुसार आपल्या भविष्याला आकार द्यावा. अभ्यास करतांना नियोजन करावे. रटाळ अभ्यास करू नये. मन एकाग्र करून अभ्यास करावा यश हे हमखास मिळेल.अभ्यास सोबतच आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. इ.10 वी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. असे मार्गदर्शन पोलिस उपनिरीक्षक मा .श्री संजय पवार यांनी केले
           हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालमनावर सुसंस्कार घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माँ जिजाऊचे कार्य मोलाचे आहे.आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्येक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चारित्र्य,संघटन , व्यवस्थापन,मुत्सद्देगिरी,शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ चे कार्य आदर्शवत आहे.तसेच स्वामी विवेकानंदांचे कार्य युवा पिढीने आत्मसात करून त्यांचा आदर्श घडवावा.असे प्रतिपादन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री जे. एच. पाकळे यांनी केले.

 स्वराज्याचा जिने घडविला विधाता ।
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता ॥

     स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून छत्रपती शिवरायांना ते स्वप्न दाखवणाऱ्या आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणास्त्रोत स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब यांचे कार्य महान आहे.त्यांनी स्वराज्यासाठी शुरवीर असे शिवाजीराजे दिले. व स्वराज्याची घडी बसविली.तसेच " अपयश हे संध्याकाळी विसरुण जायचे असते कारण उजाडलेली सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी घेऊन येते. यशापर्यंत पोहचविण्यासाठी,उठा, जागे व्हा आणि ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थांबु नका, हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी युवा पिढीला दिला. विश्वात अशी निराळी ओळख असणाऱ्या या महान व्यक्तिंचे कार्य युवा पिढीने आत्मसात करावे असे आवाहन विद्यालयाचे पर्यवेक्षक एम. बी. सावकार यांनी केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  जे. एच पाकळे यांनी केले.
     या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष  अतुल ( नाना ) नरेंद्र अहिरे, दिपक वानखेडे, कैलास मालपाणी, पत्रकार संजय जाधव, राकेश शिरोडे उपस्थित होते.
       कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीचे प्रमुख, सर्व सदस्य शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)