📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आरोग्य समस्यांबाबत आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे मनपास निवेदन.

मालेगाव : येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे आरोग्य समस्यां बाबत निवेदन मनपा उपआयुक्त अनिल पारखे साय्यक आयुक्त सचिन महाले यांना देण्यात आले.  करोडो रुपये खर्च करून देखील आर. टी. पी. सी. आर. लॅब सुरू न झाल्या प्रकरणी सखोल चौकशी होणे व्हावी  कॅम्प दवाखान्यात योग्य प्रकारे आरोग्य सुविधा मिळावी मालेगाव महानगर पालिके तर्फे पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यात यावी आदी विषयावर निवेदन देण्यात आले. 
         मालेगाव महानगर पालिके तर्फे मालेगाव शहरात कोविड साथीच्या नियंत्रणासाठी आर. टी. पी. सी. आर. लॅब उभारण्याचा निर्णय घेतला होता. कोविडच्या दुसऱ्यालाटे नंतर (सन 2021) साधारण 3 कोटीं रक्कमेची मंजुर झालेली कोरोना तपासणी लॅब (RTPCR lab) अजुन 2023 पावेतो कार्यान्वित झाली नाही. विनाटेंडर लॅब उभारण्याचे काम देऊन देखील तसेच ठेकेदाराला दीड कोटीपेक्षा जास्त अग्रीम रक्कम देऊन देखील लॅब तात्काळ चालू करण्यात आली नाही. ३-४ कोटींचा खर्च करून देखील या लॅब चा उपयोग जनतेला होणार नसेल तर हा खर्च का करण्यात आलाआणि  कोणाच्या दबावात करण्यात आला ?  याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आज लॅब चालू झाली तरी साप जाऊन भुई थोपटण्याहुन वेगळे काय असेल असा सवाल यावेळी करण्यात आला..
          CSR फंड व महापालिकेचा निधी मिळून सुमारे 5 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून बेसिक सुविधांसाठी पत्र्यांच्या खोल्यांसारख्या कंटेनरमध्ये दवाखाना उभारन्यात आला आहे . मॉड्युलर रुग्णालयाच्या नावाने 100 खाटा (कॉट) ठेवण्याच्या खोल्या तयार करून 1 वर्ष पूर्ण होऊन देखील येथे सोनोग्राफी, ECG, X-ray, रक्त चाचणींची सुसज्ज लॅब, सिझर यासारख्या अत्यावश्यक तसेच प्राथमिक सुविधा अजुन उपलब्ध झाल्या नाहीत. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना ऊन -पावसात उभे रहावे लागते तेथे छताची सुविधा नाही. डॉक्टर व कर्मचारी AC मध्ये बसून रुग्णांशी उर्मट पणे बोलतात, स्वतःचे काम करण्यास टाळाटाळ करतात त्याचा एकूण परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.. 
         या दवाखान्याच्या पूर्व दिशेला सोमवार बाजाराकडे असलेला मुख्य व पारंपरिक दरवाजा बंद करण्यात आला आहे, त्यामुळे रुग्णांना फिरून यावे लागते. तो दरवाजा बंद असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ज्या ठिकाणी आरोग्य सुविधा आपण देतो आहे त्या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य असणे गरजेचे आहे परंतु या दवाखान्याच्या उत्तर बाजून 50 मीटर अंतरावर मटण मार्केट आहे. त्यामुळे खूप घाण होऊन डास, माशा निर्माण होत रोगराई पसरण्यास मदत करतात. त्यामुळे मटण मार्केट तेथून काढून त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देत स्थलांतरित करणे आवश्यक आहे. तसेच पूर्व बाजूचा दरवाजा उघडल्यास वयोवृद्ध व अपंगत्व रुग्णांना प्रवेश सोईचा होत अस्वच्छता निर्माण होणार नाही. 
          कॅम्प दवाखान्यात डॉक्टर लहान मुलांना तपासत नाही ओळखीचे तसेच वशील्याच्या रूग्णांनाच सलाईन लावता, ड्रेसिंग साठी ताटकळत रहावं लागते अशी नागरिकांची तक्रार आहे. कॅम्प दवाखाना हा फक्त सकाळी ८ ते रात्री ८ सेवा देतो. सायंकाळी ६ नंतर ड्रेसिंग, टिटी किंवा कुत्रा चावल्याचे इंजेक्शन मिळत नाही. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. १०० खाटांचे कॅम्प रुग्णालय सध्या स्थितीत फक्त दोनच खोलीत चालू असून इतर खोल्या महिला रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. आरोग्य सुविधा २४  तास मिळत नसेल तर मग करोड रुपये खर्च करून हे मॉड्युलर हॉस्पिटल का निर्माण केले ? हा प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे. शहराच्या पश्चिम भागात मालेगाव महानगर पालिकेचे एकमेव रुग्णालय असुन त्याचा विकास वाडीया, अलि अकबर व अलहाज या पुर्व भागातील रुग्णालयाप्रमाणे भविष्याचा विचार करत सुसज्ज इमारत व सेवा सुविधांसह निर्माण होणे आवश्यक होते, परंतु तसे न करता फक्त पत्र्याच्या कंटेनरमध्ये विस्तार करून CSR फंडाचा मलिदा लाटुन घेतला असे म्हणायला वाव निर्माण होतो. मनपा प्रशासानातर्फे त्यांच्या दोन दवाखान्यांमध्ये सेवा सुविधा, अधिकारी व कर्मचारी पुरवण्यात भेदभाव केला जातो. सद्यस्थितीत चालू असलेल्या मनपाच्या दोन हॉस्पिटलमध्ये कॅम्प मॉड्युलर हॉस्पिटलकडे दुर्लक्ष करून अलहाज हॉस्पिटलकडे विशेष व पुरेपूर लक्ष दिले जाते. सुमारे वर्षभरापूर्वी माननीय मंत्री महोदय व मा.आयुक्त साहेब यांनी कॅम्प परिसरातील नागरिकांना मोठमोठे स्वप्न दाखवत विविध सोयी सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसली. सदर मॉड्युलर रुग्णालय म्हणजे "असुन अडचण नसून खोळंबा" असे झाले आहे. असा आरोप देखील करण्यात आला.
              शहरातील पुर्व भागातील वाडीया, अलिअकबर व अलहाज या तिन दवाखान्यांपैकी वाडीया व अलिअकबरचे १०० खाटांचे पुनर्निमानाचे काम घाईघाईत चालु करण्यात आले. तेथील आरोग्य सेवा सुविधांची पर्यायीव्यवस्था व नियोजन न करता तेथील प्रसुती व इतर सुविधा बंद करण्यात आल्या. त्या भागातील आरोग्य सुविधा घेणारे महिला अबाल-वृद्ध यांना रुग्णालय निर्माण होईपर्यंत वाऱ्यावर सोडन्यात आले. त्यांच्या आरोग्याची होणारी हेळसांड याला जबाबदार कोण?
             कोविड सारखी जागतिक महामारीने शहरातील अनेक नागरिकांचा बळी घेतला असुन देखील मालेगाव शहरातील आरोग्य व्यवस्थेला अजूनही जाग येऊ शकली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मनपा प्रशासनाने एवढ्या मोठ्या संकटानंतर देखील काही धडा घेतला आहे असे वाटत नाही. उलट ते अधिक बेफिकीर व ढिम्म झाले आहे. आरोग्याचा कारभार नियोजन शून्य पद्धतीने चालु असुन कोरोना लॅब चालू न होऊ शकणे, कॅम्प मॉड्युलर हॉस्पिटलमधील गैरसोय, मनपाच्याच विविध दवाखान्यात कर्मचारी पुरवताना होत असलेला भेदभाव यावरून महानगर पालिका आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार उघड होतो. प्रत्येक विषयात व्यक्तीश: लक्ष घालणारे नाशिक जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री महोदय यांनी याबाबत मनपा प्रशासनाला कुठलाच जाब न विचारून या सर्व नियोजन शून्य कारभराला मूक संमती दिली आहे का हा प्रश्न निवेदनाद्वारे केला आहे. 
           आरोग्य विषयक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असून शहरातील आरोग्य सेवा-सुविधांत सुधारणा न झाल्यास या विरोधात व्यापक जनआंदोलन उभे केले जाईल असा ईशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी निखील पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, विवेक वारुळे, दादा बहिरम, राजेंद्र पाटील, श्याम गांगुर्डे, आनिल पाटील,रोषण गांगुर्डे. आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने