मालेगाव : भारत हा कृषिप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तर शेतकरी आत्मा आहे, मागील काही काळापासून मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणी असलेल्या सौंदाणे येथील उपबाजार लवकरच सुरू करणार असल्याची माहिती मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापति डॉ. अद्वय हिरे-पाटील यांनी दिली आहे.
आज कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने सौंदाणे येथील नियोजित जागेची पाहणी केली, या ठिकाणी सर्व सुखसोयीयुक्त तसेच अत्याधुनिक सुविधा असलेला उपबाजार सुरू करून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला बाजार समितीत शेतकरी हाच मुख्य घटक असतो आणि शेतकऱ्यालाच केंद्रस्थानी ठेवून या बाजार समितीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात होईल आणि त्यासाठी आवश्यक तेवढा अभ्यास केला जाईल, येत्या काळात मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समिती हि महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये गणली जाईल, शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यानुसार पुढील वाटचाल करत सौंदाणे परिसरातील नियोजित उपबाजार समिती लवकरात लवकर सुरु केली जाणार असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ. हिरे यांनी केले.
संचालक मंडळाने यावेळी मुंगसे येथील उपबाजाराचीही पाहणी केली, व येथील सुविधांचा आढावा घेत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये अशा सूचना हि संबधितांना देण्यात आल्या.
यावेळी उपसभापती श्री. विनोद चव्हाण, संचालक सर्वश्री सुभाष सूर्यवंशी, रविंद्र मोरे, संदिप पवार, राजेंद्र पवार, डॉ. उज्जैन इंगळे, नंदुकाका शिरोळे, रविंद्र सुर्यवंशी, रविंद्र निकम, रविंद्र साळुंके, सौ. अरुणा सोनजकर, सौ. रत्ना पगार, सौ. मिनाक्षी देवरे, सौ. भारती बोरसे व पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता