मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील बेपत्ता झालेल्या कृष्णा अनिल सोनवणे (वय ९ वर्ष) या मुलाचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती हा मुलगा चार दिवसापुर्वी बेपत्ता झाल्याने त्याचा शोध घेण्यात येत होता. याच दरम्यान हा मुलगा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गळा चिरलेल्या व मातीच्या ढिगाऱ्यात पुरलेला अवस्थेत आढळून आला. हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता, याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक १६/०७/२०२३ रोजी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीतील पोहाणे, ता. मालेगाव येथील रहिवासी श्री. अनिल फुलसिंग सोनवणे यांचा ०९ वर्षांचा मुलगा कृष्णा अनिल सोनवणे हा शेतात खेळण्यासाठी गेला असता तो पुन्हा घरी परतला नाही, सदर मुलाचा परिसरात शोध घेतला असता तो मिळून न आल्याने त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले, यावरून वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेस गुरनं २२४ / २०२३ कलम ३६३ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यातील बेपत्ता मुलाचे वर्णनानुसार सदर गुन्हयाचा तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान पोलीस पाटील पोहाणे यांचेकडून माहीती मिळाली की, दिनांक १८/०७/२०२३ रोजी पोहाणे गावचे शिवारात मांजरे नाला परिसरातील शेतात दुर्गंधीयुक्त वास येत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पोलीस पथकांनी मा. तहसिलदार मालेगाव यांचे उपस्थितीत घटनास्थळाला भेट देवून सदरची जागा उकरून काढली असता, त्याठिकाणी मातीच्या ढिगा-याखाली पालथे परिस्थीतीत अर्धवट पुरलेले प्रेत आढळून आले. प्रेताचे वर्णनावरून खात्री केली असता, सदरचे प्रेत हे नमुद गुन्हयातील बेपत्ता मुलगा नामे कृष्णा अनिल सोनवणे याचे असल्याचे निष्पन्न झाले मयत मुलास अज्ञात आरोपीने त्याचे अज्ञात हेतूने खून करण्यासाठी अपहरण करून धारदार हत्याराने गळा कापून त्यास जीवे ठार मारले व त्याचे प्रेत जमीनीत पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे तपासात निष्पन्न झाल्याने वरील गुन्हयास भादवि ३६४, ३०२, २०१ प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग श्री. पुष्कराज सुर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देवून तपास पथकांना गुन्हा उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. मनोज पवार यांचे पथक पोहाणे परिसरात घटनेचा तपास करत होते. सदर घटनेतील अज्ञात आरोपी शोधण्यासाठी कसोशिने प्रयत्न सुरू केले, तसेच त्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक, फिंगरप्रिंट पथक तसेच फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. सदर घटनेतील घटनास्थळावर मिळून आलेल्या पुरण्याच्या वस्तू तसेच श्वान पथकाच्या मदतीने यातील आरोपी हे पोहाणे गावातीलच असल्याची खात्री झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर खाकूर्डी पोलीसांनी संशयीत १) उमाजी गुलाब मोरे, वय ४२ वर्षे, रा. पोहाणे, मांजरी नाला शिवार, ता. मालेगाव यास ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार नामे २) रोमा बापु मोरे, वय २५ वर्षे, ३) रमेश लक्ष्मण सोनवणे, वय २१ वर्षे, ४) गणेश लक्ष्मण सोनवणे, वय १९ वर्षे, ५) लक्ष्मण नवल सोनवणे, वय ४५ वर्षे, सर्व रा. पोहाणे, मांजरी नाला शिवार, ता. मालेगाव यांचेसह मिळून यातील मयत मुलगा कृष्णा अनिल सोनवणे यास दि. १६/०७/२०२३ रोजी दुपारचे सुमारास फूस लावून पळवून नेवून त्यास धारदार चाकू व ब्लेडने गळ्यावर वार करून जीवे ठार मारले असल्याबाबत गुन्हयाचे तपासात कबूली दिली आहे. यातील आरोपी क्र. १ ते ४ ज्यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचे तपासात प्राथमिकदृष्टया गुप्तधनाच्या लालसेपोटी यातील आरोपींनी मयत मुलास जीवे ठार मारले असल्याचे निदर्शनास येत आहे. घटनेचे गांभीर्य पाहता न्यायालयाने आरोपींची ७ दिवस पोलीस कस्टडी मंजूर केलेली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण श्री पुष्कराज सूर्यवंशी हे करीत आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग श्री. पुष्कराज सूर्यवंशी यांनी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. मनोज पवार, पोउनि अंकुश नवले तसेच स्थागुशाचे सपोनि देवेंद्र शिंदे, पोउनि संदीप पाटील, पोहवा चेतन संवत्सरकर, पोना देवा गोविंद, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, विजय वाघ, नितीन सपकाळे, गौतम बोराळे, संतोष हजारे, कदम, वडनेर खाकुर्डी पो.स्टे. चे श्रेपोउनि संजय पवार, सपोउनि सुर्यवंशी, पोहवा हिम्मत चव्हाण, बापु महाजन, मपोहवा निशा साळवे, पोना बाचकर, पोकॉ रणजित सोळंके, गजानन कासार, महेंद्र पवार, किरण दुकळे यांचे पथकाने अतिशय कौशल्याने सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली आहे.
तपास पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी पथकास १५,०००/- रू. चे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे.