लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने मालेगाव महानगरपालिकेत बिट मुकादम पदावर कार्यरत असलेल्या मनोहर ढिवरे याला ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ढिवरेवर अनधिकृत बांधकामाबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी १०,००० रुपयांची लाच मागण्याचा आरोप आहे.
या कारवाईत तक्रारदाराने जम जम प्राथमिक व जन्नत माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत कायदेशीर कारवाईसाठी मालेगाव महानगरपालिका येथे अर्ज दिला होता. त्या अर्जानुसार प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यासाठी व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी बिट मुकादम मनोहर बाबुलाल ढिवरे यांनी तक्रारदार यांचेकडे १०,००० रुपयांची लाच मागणी केली. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला
दि. २ नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांना ५,००० रुपयांची लाच देण्यासाठी सापळ्यात आणण्यात आले. यावेळी ढिवरे यांना ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ढिवरे याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा अधिकारी श्री.नाना सूर्यवंशी , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक पो. हवा. सचिन गोसावी, पो. हवा. शरद हेबांडे, पो. ना. विलास निकम, चा. पो..ना. परशुराम जाधव.यांच्या पथकाने ही कारवाई केली
या कारवाईबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तसेच त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.