जालना, 02 नोव्हेंबर 2023: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तापलेल्या वातावरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा करून त्यांना समजूत काढली.
आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार बच्चू कडू, निवृत्त न्यायमूर्ती एम.जे.गायकवाड, न्या. सुनील सुक्रे आणि राज्य मागासवर्ग आयोग यांचा समावेश होता. मंत्री धनंजय मुंडे आणि उदय सामंत यांचीही यावेळी उपस्थिती होती.
न्यायमूर्तींनी जरांगे पाटील यांना मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, पण घाईगडबडीत निर्णय होऊ नये, असे सांगितले. घाईत घेतलेले निर्णय न्यायालयात टिकत नाहीत. कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घ्यावे लागतील. एक दोन दिवसात कोणतेही आरक्षण मिळत नाही, असे सांगितले.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ देत आहे. यानंतर वेळ देणार नाही, असा अल्टीमेटम त्यांनी दिला. दगाफटका केला तर मुंबईला धडकणार, अशा इशारा त्यांनी यावेळी दिला.
२ जानेवारी पर्यंत वेळ देण्याची शिष्टमंडळाने मागणी केली. ही मागणी जरांगे यांनी मान्य करून सरकारला २ जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. वेळ घ्या पण सरसकट आरक्षण द्या. आता सरकारला दिलेला वेळ शेवटचा असेल, असा अल्टीमेटम त्यांनी यावेळी दिला.
शिष्टमंडळाच्या मध्यस्थीनंतर जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र साखळी उपोषण सुरुच राहील, असेही ते यावेळी म्हणाले.
.jpg)