राकेश आहेर:- (देवळा)
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनानिमित्त जाणता राजा मित्रमंडळ उमराणे व ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विध्यार्थीचा गौरव सोहळा नुकताच संपन्न झाला.
उमराणा येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने उमराणे व परिसरात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात यावर्षीही शनिवार दि.११ मार्च २०२३ रोजी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत: उमराणे येथील कै. प्रवीण विश्वासराव देवरे व कै. यशवंत नंदकिशोर देवरे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजेच्या प्रतिमेचे पूजन माजी.सरपंच दिलीप देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत कु.जयेश प्रशांत देवरे यांची मुख्य वित्त व लेखाधिकारी पदी निवड झाल्याने तसेच उमराणे येथील भाची कु. तेजस्विनी प्रफुल्ल आहेर यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाल्या बद्दल अनुक्रमे माजी प.स.सभापती धर्मा देवरे व माजी जिल्हा बँक निरीक्षक सुदाम देवरे यांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.सदस्य नुतन आहेर, सुनील आहेर, चिंतामण मगर, मुरलीधर देवरे, बाजार समिती संचालक प्रवीण देवरे, सुनील देवरे, बाळासाहेब देवरे, मा.सरपंच दत्तू देवरे, उपसरपंच भरत देवरे, भुषण देवरे, फुला देवरे, केदा आण्णा, पुंडलिक गायकवाड, बळिराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रस्ताविकात हिंदवी स्वराज्यासाठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या ३२ वर्षाच्या कालखंडातील शौर्याची माहिती विषद केली. तसेच सन्मानार्थी कु.जयेश देवरे व कु.तेजस्विनी आहेर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शिरसाठ यांनी छत्रपती संभाजीराजे यांनी रयतेसाठी दिलेल्या बलिदानाचा आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले. यावेळी संदीप देवरे यांनी आभार मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.