राकेश आहेर:- (देवळा)
संपुर्ण महाराष्ट्रात दि. २२ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी रास्ता आंदोलन पुकारलेले होते. त्या अनुषंगाने देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर देवळा कळवण रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले.
विशेषता नाशिक जिल्ह्यात कांद्याला खरीप व रब्बी हंगामातील कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काही कांदा उत्पादकांनी तर उभा कांदा पेटवुन देण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे कांद्यावर मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने कांदा उत्पादकांनी शेतात मेंढ्या सोडल्या तर काहींनी कांद्याच्या शेतात रोटर फिरविला आहे असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापुस, इत्यादी पिकांना हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले असल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे, शेतकऱ्यांनी पै-पै जमा करुन पिक विम्याचे पैसे भरले परंतू अद्यप पर्यंत शेतकऱ्यांना एक पै ही मिळाले नाहीत. तरी पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ मिळावेत. तसेच सद्या शेतकऱ्यांचा विद्युत पंपाचा पुरवठा वारंवार खंडीत होत असुन किमान दहा तास सलग दिवसा लाईट मिळावी. या अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनात कसमादे मधील राज्य कांदा उत्पादक संघटना, व अनेक शेतकरीहित संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता.
सुमारे दिड तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनातुन सरकारचे शेतकऱ्यांनकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला व आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचवण्यासाठी तहसीलदार विजय सुर्यवंशी, प्रशिक्षणार्थी तहसीलदार गौरी धायगुडे, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, समन्वयक कुबेर जाधव, उपजिल्हाध्यक्ष रविंद्र शेवाळे, युवा अध्यक्ष तुषार शिरसाठ, देवळा तालुकाध्यक्ष कैलास कोकरे, मधुकर पाचपिंडे, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते पंडितराव निकम, जितेंद्र आव्हाड युवामंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सुर्यवंशी, नगरसेवक संतोष (गोटु) शिंदे व असंख्य शेतकरी उपस्थित होते.