देवळा:- राकेश आहेर
भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडिल आदेशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ अंतर्गत प्रारूप मतदार यादी आज दि. ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्व मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार दि १० नोव्हेंबर २०२२ रोजी सर्व ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर ग्रामसभेमध्ये संबंधित ग्रामपंचायत मधील सर्व बीएलओ हे मतदार यादीचे वाचन करणार आहेत. तसेच नवीन नाव नोंदणी, मयत मतदार यांचे फॉर्म नंबर ०७ भरणे, मतदार यादीला आधार क्रमांक लिंक करणे, बाकी असलेल्या मतदारांचे आधार क्रमांक लिंक करणे याबाबतची कार्यवाही करणार आहेत.
गावातील सर्व नागरिकांनी मतदार यादीतील नोंदी तपासून घेण्याबाबत याद्वारे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीतील मतदार नोंदणी बाबत नागरिकांना काही हरकत असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाचे असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवायचे असल्यास त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी.एल.ओ यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज भरून द्यावा .
चालू वर्षीपासून १ जानेवारी २०२३, १ एप्रिल २०२३, १ जुलै २०२३, आणि १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होणार आहे अशा युवकांना नाव नोंदणीसाठी आगाउ अर्ज सादर करता येणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी व मतदारांनी सदर ग्रामसभेला उपस्थित राहून विशेष ग्रामसभेतील मतदार यादीच्या कामकाजामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन देवळा तालुक्यातील सर्व नागरिकांना देवळ्याचे तहसीलदार विजय सूर्यवंशी, व निवडणूक नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे.