नाशिक ग्रामीण जिल्हयात सन २०२१ मध्ये ७८८ प्राणांकीत अपघात झालेले असुन त्यामध्ये ८६२ इसम मयत झालेले आहेत. तसेच जानेवारी ते ऑक्टोंबर २०२२ पावेतो ६९४ प्राणांकीत अपघात झालेले असुन त्यामध्ये ७५२ इसम मयत झालेले आहेत.
रस्ते अपघातातील मयतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदरचे अपघात हे प्रामुख्याने अतिवेगाने वाहने चालविणे, विरूध्द दिशेने वाहन चालविणे, रस्ते दुभाजक तोडून त्यातून बेकायदेशीरपणे वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर झाल्याने, अचानकपणे व असुरक्षितपणे लेन बदलल्याने, विना सिटबेल्ट वाहन चालविल्याने, तसेच दुचाकीस्वारांनी विना हेल्मेट वाहन चालविल्याने घडलेले आहेत.
रस्ते प्रवास अधिक सुरक्षित व्हावा व अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांचा जीव वाचावा, या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बेशिस्त, बेजबाबदार व नियमबाहय वाहतूकीस आळा घालण्याच्या सूचना जिल्हा वाहतूक शाखेस दिल्या आहेत.
उपरोक्त आदेशानुसार, मागील (४) दिवसांत जिल्हा वाहतूक शाखेने नाशिक ग्रामीण हद्दीत वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यावर (२२२३) केसेस केल्या असुन अवैधपणे प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या (५६) वाहनांवर मोटार वाहन कायदा कलम ६६ / १९२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत वाहनधारकांना एकूण १०,९६, ६५० /- रूपयांचा दंड करण्यात आला आहे.
सदर कारवाईत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. देविदास दुमणे, सहा. पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दगु सोनवणे, कैलास देशमुख, अशोक कदम, प्रताप जाधव, वाल्मीक रोकडे, व (७०) अमंलदारांनी सहभाग घेतला. बेकायदेशीर व बेशिस्तपणे वाहन चालवविणाऱ्यांविरूध्द सदरची कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी रहदारीच्या नियमांचे पालन करून सर्वांच्या सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा वासियांना ग्रामीण वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे..