दिनांक १४/११/२०२२ रोजी मदुराई, तामिळनाडू येथील मुळ रहीवासी असलेल्या व सध्या गुजरातमधील अहमदाबाद येथे कार्यरत असणा-या एका २४ वर्षीय व्यापा-यास अहमदाबाद ते धुळे प्रवासादरम्यान आरोपीतांनी त्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याची माहिती अपहृत व्यक्तीचे भाऊ श्री. निलेश भंडारी, रा. मदुराई, राज्य तामिळनाडू यांनी नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांना फोनव्दारे दिली होती. सदर घटनेबाबत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना तात्काळ माहिती देवून अपहृत इसमाचा शोध घेवून पुढील कारवाईबाबत सुचना दिल्या होत्या. अपहृत व्यक्तीच्या भावाने कळविलेल्या माहितीप्रमाणे तो सटाणा परिसरात असल्याचे समजले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व वडनेर खाकुर्डी पोलीसांनी नाशिक व धुळे जिल्हयाचे सीमावर्ती भागातील जंगल व डोंगराळ परिसरात कसोशीने शोध घेवून अपहृत व्यक्ती नामे मुरली रघुराज भंडारी, वय २४, रा. अरिहंत सोसायटी, मदुराई, राज्य तामिळनाडू सध्या राहणार अहमदाबाद, राज्य गुजरात याची दरोडेखोरांचे ताब्यातून सुखरूप सुटका केली.
सदर प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी आहे की, दिनांक १४/११/२०२२ रोजी यातील अपहृत व्यक्ती नामे मुरली रघुराज भंडारी हे अहमदाबाद ते धुळे प्रवास करीत असतांना त्यास यातील आरोपीतांनी फोनव्दारे संपर्क साधून कमी किंमतीत सुझलॉन कंपनीचे तांब्याचे भंगार आणुन देतो असे अमिष दाखवून त्यास धुळे बस स्टॅण्ड वरून मोटरसायकलवर बसवून डोंगराळे परिसरात आणले होते. सदर ठिकाणी त्यास मारहाण करून त्याचेजवळील ४०००/- रोख रूपये व घडयाळ जबरीने काढुन घेतले व त्याचे सुटकेसाठी त्याचा भाऊ निलेश भंडारी यास ०३ लाख रूपये खंडणीची मागणी करून पैसे फोन पे वर न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. सदरबाबत मिळालेल्या माहितीवरून मा. पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ पथके रवाना केली, दरम्यान अपहृत व्यक्तीचे नातेवाईकांनी पोलीस पोहचेपावेतो थोड़ी-थोडी रक्कम फोन पेव्दारे खंडणीखोरांना ट्रान्सफर केली व त्याकाळात पोलीस पथकांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास करून अपहृत व्यक्ती व खंडणीखोर हे भारदेनगर परिसरात असल्याचे स्थान निश्चित करून सदर ठिकाणी छापा टाकुन अपहृत व्यक्तीची सुटका केली. त्यात आरोपी नामे १) दादाराम अख्तर भोसले, वय ३६, २) बबलु उर्फ बट्टा छोटू चव्हाण, वय २८, दोघे रा. हॅकळवाडी, ता. जि. धुळे यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे साथीदार नामे ३) शामलाल भारलाल पवार, ४) लुकडया फिंग्या चव्हाण, ५) मुन्ना कलेसिंग भोसले, ६) रामदास उर्फ रिझवान भारलाल पवार, सर्व रा. हॅकळवाडी, ता. जि. धुळे हे पोलीसांची चाहूल लागताच डोंगराळ भाग व जंगलाचा फायदा घेवून पळुन गेले. सदर प्रकरणाबाबत मालेगाव तालुका पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ६२४ / २०२२ भादवि कलम ३४२, ३६४ (अ), ३९५, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाणेकडील पोउनि एस. डी. कोळी हे करीत आहेत.
सदर गुन्हयाचे तपासात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि देवेंद्र शिंदे वडनेर खाकुर्डी पो.स्टे., सपोनि हेमंत पाटील मालेगाव तालुका पो.स्टे. पोउनि एस.डी. कोळी, पोउनि संदिप पाटील, सपोउनि विठ्ठल बागुल, पोहवा कुवर, पोना देवा गोविंद, फिरोज पठाण, गणेश पवार, दत्ता माळी, किरण दुकळे तसेच धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संयुक्तरित्या शोधमोहीम सुरू करून अपहृत व्यक्ती डांबून ठेवलेल्या ठिकाणी पोहोचून, अपहृत व्यक्तीची सुटका केली व सदर ठिकाणाहून ०२ आरोपींना मोटरसायकलसह ताब्यात घेवून कामगिरी केली आहे. तपास पथकास मा. पोलीस अधीक्षक यांनी १०,०००/- रु. चे बक्षिस देवून त्यांचे अभिनंदन केले आहे.