दिनांक १२ / ११ / २०२२ रोजी पहाटेचे सुमारास मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत सटाणा नाका परिसरात असलेले अॅक्सीस बँकेचे ए.टी.एम. गॅस कटरच्या सहाय्याने अज्ञात आरोपीतांनी फोडून ए. टी. एम. मधील रोकड पळवण्याचा प्रयत्न केल्याबाबत मालेगाव कॅम्प पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. १७५ / २०२२ भादवि कलम ३८०, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटना सुरू असतांनाच ए. टी. एम. मधील सेंट्रल अलार्म व मॉनीटर सिस्टीमव्दारे मुंबई येथील हेड ऑफिसला ए.टी.एम. चोरीबाबत माहिती मिळाली, त्यांनी सदरची माहिती त्वरीत मालेगाव कॅम्प पोलीस ठाणेस कळविल्याने, कॅम्प पोलीसांचे रात्रगस्तीवरील पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलीसांची चाहूल लागताच चोरटयांनी ए.टी.एम. सेंटरमध्ये गॅस कटर व सिलेंडर जागेवरच सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पळ काढला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी सदरचा गुन्हा हा भरवस्तीत घडलेला असल्याने गुन्हयाचे गांभीर्य ओळखून गुन्हा उघडकीस आणणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. तसेच घटनास्थळी श्वानपथक व अंगुलीमुद्रातज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. सदर गुन्हयाचे तपासात स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ए.टी.एम. सेंटर परिसरातील प्राप्त फुटेज व मालेगावातील गॅसकटर व सिलेंडर विक्रेत्यांकडून माहिती घेवून सदर गुन्हयातील आरोपींचे प्राप्त वर्णनावरून मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे संशयीत नामे १) उमेर आबीद शेख, वय १९, रा. नयापुरा, गली नं. ४, मालेगाव, ता. मालेगाव याचेसह, ०४ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवून वरील गुन्हयाबाबत सखोल चौकशी केली असता, त्यांनी दि. १२/११/२०२२ रोजी पहाटेचे सुमारास सटाणा नाक्यावरील अॅक्सिस बँक ए.टी.एम. फोडल्याची कबुली दिली. सदर आरोपींनी गुन्हयात वापरलेल्या दोन मोटर सायकल व ०४ मोबाईल फोन असा एकुण १,२४,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि काळे व पोहवा डिंगर हे करीत आहेत.
सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, पोहवा गिरीष निकुंभ, पोना नरेंद्रकुमार कोळी, शरद मोगल, पोकॉ योगेश कोळी यांनी परिश्रम करून उघडकीस आणला असून पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास १०,०००/- रू. चे बक्षिस देवून त्यांचे अभिनंदन केले आहे.