📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मुंबई पाठोपाठ मालेगाव शहरात गोवरची साथ; 44 रुग्ण दाखल

मागील काही दिवसापासून मुंबईमध्ये सुरु असलेली गोवरची साथ आता मालेगाव शहरामध्ये देखील पोचली आहे. 
गोवर साथीच्या आजाराने आतापर्यंत ४४ रुग्ण महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

गोवर साथ नियंत्रणासाठी तातडीने मनपा प्रशासनाच्या वतीने पाऊले उचलली जात आहे. बहुसंख्य रुग्णांनी गोवरची लस न घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात गोवरचे रुग्ण आढळुन आल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

पालकांनी काळजी न करता आपल्या कुंटुबातील वय वर्षे ९ महिने ते १८ महिन्याचा बालकांना गोवर डोस दिला आहे की, नाही याची खात्री करावी. गोवर लसीकरण दिले नसेल तर जवळील नागरी आरोग्य केंद्रात, व नियमित लसीकरण होणा-या मदरसा/अंगणवाडी, खाजगी रुग्णालय, येथे जाऊन गोवर लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी व आरोग्याधिकारी सपना ठाकरे यांनी केले आहे.

काय आहे गोवर हा आजार?
गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक (विषाणू) आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. कुपोषणामुळे आपल्या देशात गोवराचे अनेक दुष्परिणाम होतात आणि मृत्यूही होतात. म्हणूनच मुलांच्या महत्त्वाच्या 6 सांसर्गिक आजारांत गोवराचा समावेश केलेला आहे. (हे 6 आजार म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ आणि गोवर.) सुदैवाने गोवराविरुध्द परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध आहे.

पूर्वी गोवर साधारणपणे दर दोन-तीन वर्षांनी साथीच्या स्वरुपात येत असे. आता गोवर लसीमुळे साथी कमी झाल्या आहेत. आपल्या देशात गोवर मुलाच्या पहिल्या दोन-तीन वर्षे वयातच येऊन जातो, पण तो उशिराही येऊ शकतो. गोवर एकदा येऊन गेला, की जवळजवळ आयुष्यभर टिकणारी प्रतिकारशक्ती (गोवराविरुध्द) देऊन जातो. म्हणून त्या व्यक्तीला परत गोवर होत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला गोवर झालेला नसेल तर आयुष्यात कधीही तो येऊ शकतो. गोवर उशिराच्या वयात येणे जास्त त्रासदायक असते.

काही पालक मुलाला पूर्वी एकदा गोवर होऊनही (पूर्ण लक्षणांसहित) काही मुलांना पुन्हा ‘गोवर’ निघाला असे सांगतात. बहुधा हे आजार गोवरसदृश इतर विषाणूंमुळे असतात.
या आजाराच्या तीव्रतेप्रमाणे मोठे पुरळ येतात. पुरळ लालसर असतात आणि त्यात पू होत नाही. ताप सुरू झाल्यापासून 3 ते 7 दिवसांत पुरळ दिसू लागतात. हे पुरळ चेह-याकडून सुरू होऊन पायांकडे पसरतात. पायांवर पुरळ पोहोचेपर्यंत ताप उतरतो. खोकला मात्र नंतरही थोडे दिवस टिकतो. हे पुरळ तीन दिवस टिकतात व आपोआप जातात. पुरळाच्या जागी पिवळसर ठिपका दिसतो व मग अस्पष्ट होतो. पुरळ सर्वसाधारणपणे कानाच्या मागे, चेहरा, मान या क्रमाने छाती, पोट यांवर येतात. शेवटी ते हातापायावर पसरतात. पण कधीकधी ते हातापायावर यायच्या आतच गोवर जातो. कानामागून झालेली सुरुवात हातापायापर्यंत पसरायला 2-3 दिवस लागतात. पुरळ ज्या क्रमाने येते त्याच क्रमाने वरून खाली नाहीसे होतात. काही दिवस पुरळांच्या जागी खुणा राहतात.
वाढत जाणारा ताप पुरळ उठायचे थांबल्यावर लगेच शमतो.
तोंडातील पुरळांमुळे काही खाता येत नाही, भूक मंदावते.
तापाबरोबर ठिकठिकाणच्या रसग्रंथी (मान, काख, जांघ) सुजतात व थोडया दुख-याही असतात. पोटातल्या रसग्रंथी सुजल्यामुळे काही मुलांना पोटात दुखते. टॉन्सिल, ऍडेनोग्रंथी आणि पांथरी हेही रससंस्थेशी संबंधित असल्याने तेही थोडयाफार प्रमाणात सुजतात व दुखतात.
श्वासनलिकादाहामुळे खोकला येतो.
सर्वसाधारणपणे पुरळ निघायला सुरुवात झाल्यापासून सहा-सात दिवसांत मूल बरे होते.
ताप उतरून नंतर पुन्हा येऊ लागल्यास किंवा पुरळ पायांपर्यंत गेल्यावरही ताप न शमल्यास गोवराच्या दुष्परिणामांची शक्यता लक्षात घ्यावी. यावर बालरोगतज्ज्ञाने तपासलेले चांगले.

गोवराचे दुष्परिणाम
गोवरानंतर जिवाणूसंसर्गाचे आजार होण्याची प्रवृत्ती होते. त्यामुळे न्यूमोनिया, कान दुखणे, सुजणे, फुटणे, क्षयरोग उफाळून येणे, इत्यादी त्रास होतो.

गोवराच्या विषाणूंमुळे मेंदूला सूज येऊन मूल दगावू शकते. गोवराचा मुख्य दुष्परिणाम म्हणजे कुपोषण आणि न्यूमोनिया. न्यूमोनियामुळे मूल दगावू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने