पोलिसांनी जमा केलेला तक्रारदाराचा ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत अटक केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांचा ट्रॅक्टर नांदगाव पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला होता. तो सोडवण्याकरता संशयित अभिजीत कचरू उगमुघले (२९, पोलीस शिपाई, नेमणूक नांदगाव पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण) याच्या सांगण्यावरून सुरेश पंडित सांगळे (वय ५४,पोलीस हवालदार, नेमणूक नांदगाव पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण) याने 35 हजार रुपयांची लाच मागितली.
यावरून तक्रारदार याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. यावरून पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक वाचक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने सापळा रचून दोघाही संशयितांना लाच स्विकारतांना अटक केली.