मालेगाव (तुषार देसले) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत शहरातील वर्धमान शिक्षण संस्था संचालित श्री र.वी.शाह विद्यालयात ९ ते १५ ऑगस्ट 'क्रांती सप्ताह' दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.१३) सायंकाळी संगमेश्वर परिसरातून मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ५० हून अधिक मशाली प्रज्वलित करून काढण्यात आलेली रॅली लक्षवेधी ठरली.
क्रांती सप्ताह अंतर्गत निबंधलेखन, हस्ताक्षर लेखन, चित्र रेखाटन, रांगोळी रेखाटन, स्वातंत्र्याचा दीपोत्सव, समूहगीतगायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'घरोघरी तिरंगा' व ' माझा देश, माझा अभिमान' विषयावर विद्यार्थांनी विचारप्रवर्तक निबंध लेखन केले. तर रांगोळी व चित्र रेखाटनातून विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार दाखवत देशाप्रती असलेली प्रेमभावना व्यक्त केली. घरोघरी तिरंगा, करोना संकटावर देशाने केलेली मात, विविध सामाजिक विषयांवर चित्र व रांगोळी रेखाटन करण्यात आले होते. ७५ या अंकात रांगोळी रेखाटन करून त्यावर शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आल्याने ७५ वर्षाच्या स्मृतींना उजाळा मिळाला. शनिवारी (दि.१३) सायंकाळी या उपक्रमांचा समारोप मशाल रॅलीने करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष परेश शाह, सहसचिव गौतम रमेशचंद्र शाह, गौतम प्रकाश शाह, प्राचार्य व्ही.एन.कासार, पर्यवेक्षिका एस. एस. देशपांडे, मुख्याध्यापक नितीन ठाकरे आदींच्या उपस्थिती मशाल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
अश्वावर विराजमान भारत माता, बँड पथक, तिरंगा पथक आणि हातात पेटत्या मशाल, 'भारत माता की जय' अशा घोषणांनी संगमेश्वर परिसर देशभक्तीपर वातावरणाने भारावून गेला. परिसरातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, महिला, विद्यार्थ्यांनी देखील रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. जागोजागी रांगोळ्या रेखाटण्यात आल्यात. पुष्पवृष्टी करण्यात आली. सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केले. रामसेतू पुलावरील छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन मशाल रॅलीचा समारोप करण्यात आला. या निमित्ताने विद्यालय इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. क्रांती सप्ताह आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पालकांचे सहकार्य लाभले. प्राचार्य कासार यांनी समारोप प्रसंगी आभार मानले.
बघा व्हिडियो