प्रशांत गिरासे -वासोळ
मृग नक्षत्राच्या सुरवातीला आलेल्या पावसाने आता पूर्णपणे पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. सुरवातीला काही भागात सोडले तर अजूनही अनेक भागात मोठा पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले असून, खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात काही भागात सुरवातीला दमदार पाऊस झाला. मात्र त्यांनतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. तर देवळा तालुक्यात अजूनही काही भागात मान्सूनचा पाऊस दाखल झाला नाही. जुन महिना संपत आला त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली दमदार पाऊस झालाच तर पेरण्या करता येणार आहे.
देवळा तालुक्यात सुरवातीला काही भागात दमदार पाऊस झाला होता. तर काही भागात पावसाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र आता पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. राज्यात मान्सूनचे सर्वत्र आगमन झाले असले तरी अजूनही देवळा तालुक्यात मात्र पावसाने दांडी मारलेली दिसून येत आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. एक टक्काही पेरणी न झाल्यामुळे दुष्काळाचे सावट अधिकच गडद होत चाललेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यातील पर्जन्यमान बघताच यंदा त्याचे 40% देखील पाऊस झालेले नाही. यंदा पाऊस नसल्यामुळे देवळा तालुक्यात बहुतांशी भागात भुईमूग, सोयाबीन, मका, बाजरी पेरण्या लांबलेल्या आहेत. बळीराजाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच बी-बियाणे, खाद्य घेवण ठेवले. पण पावसाने पाठ फिरवली म्हणून बळीराजा आभाळाकडे बघत आहे. पाऊस केव्हा येईल अशी अपेक्षा बळीराजा करत आहे.