राकेश आहेर (देवळा)
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत आरटीई अंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक असते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून आरटीई अंतर्गत थकीत फी परतावा शाळांना मिळाला नाही. असे अनेक शाळांचे म्हणणे आहे. त्यामुळे देवळा तालुक्यातील अनेक शाळांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पोर्टलवर नोंदणी काही अंशी रखडलेली दिसते आहे.
कोरोनामुळे निधी नसल्याचे कारण सांगत अनुदान देण्यास शासन विलंब लावत होती, परंतु कोरोना महामारी समाप्त झाली असली तरी शासनाने कुठलेही पाऊले उचललेली दिसत नाही. त्यामुळे शासन व खासगी शाळांच्या भांडणात विद्यार्थी भरडला जात असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी खासगी विनाअनुदानित शाळांना शासनामार्फत चालना देण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेनंतर शासनामार्फत आरटीई प्रवेश देणाऱ्या संस्थांना अनुदान देण्यात येते. ते न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने गेल्या चार वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शासन निधी नसल्याचे सांगत फी परतावा दिला नाही. त्यामुळे शासन व खासगी शाळांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना हीच शंका पालकांना येऊ लागली आहे. त्यामुळे पालकांनिही शासनाकडे शाळेंना अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली आहे. कारण खाजगी शाळांना अनुदान न मिळाल्याने ते आर.टी. ई अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनकडे शाळा लक्ष देतात की नाही याची शंका आता पालकांना सतावत आहे. शासनाने येत्या १५ दिवसांत आरटीई अंतर्गत फी परतावा देण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील अनेक खाजगी शाळा करत आहेत.
📍 आर टी ई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशाचे अनुदान चार वर्षांपासून थकीत आहे. शासनाने शाळांना फी परताव्याचे अनुदान वेळेत न दिल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देणे जिकिरीचे झाले आहे.
- भिका बोरसे
प्राचार्य नवनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल मेशी.
📍ज्या विद्यार्थ्यांचे आर.टी.ई मध्ये नाव आले आहे. त्यांना शाळांनी प्रवेश देणे बंधनकारक आहे. अन्यथा शाळांवर कारवाई करण्यात येईल.
-सतिष बच्छाव
गटशिक्षणाधिकारी देवळा
📍 शासन व शाळा या दोघांनमुळे जर विद्यार्थ्यांची हेळसांड झाली तर अखिल भारतीय छावा संघटनेकडून आंदोलन छेडले जाईल.
-विष्णु जाधव
अ.भा.छावा मराठा संघटना प्रवक्ते