📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नशेसाठी गुंगी आणणारे खोकल्याचे औषध विक्री करणारे अटकेत; उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाची कारवाई

 दोघा तरुणांच्या ताब्यातून ३३७ औषधाच्या बाटली जप्त 
 शहर व परिसरात सध्या बोकाळलेली गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता रोखण्यासाठी  पोलिसांना अपयश आले आहे. शहरातील गुन्हेगारीत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असतांना नशेखोरीसाठी अल्प्राजोलम (कुत्ता गोळी) सारखे हानीकारक गोष्टींचे येथील तरुण सर्रास सेवन करतात. इतकेत नव्हे तर आता गुंगी येण्यासाठी खोकल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचे सेवन करण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. मालेगाव पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत पोलिसांनी दोन संशयित तरुणांच्या ताब्यातून खोकल्याच्या ओषधाच्या ३३७ बाटली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोघा तरुणांना पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.

शनिवारी (दि.२६) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी औषध निरीक्षक प्रशांत ब्राम्हणकार यांनी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार (दि. २६) रोजी शहरातील जुना आग्रा रोडवरील एका ऑईल कंपनीच्या भिंतीलगत वसीम अहमद मोहमद सलीम (वय २६, रा. मुस्लिमनगर, मालेगाव), रफिक अहमद निहाल अहमद (वय २४, रा. मुस्लिम नगर, मालेगाव हे दोघे तरुण या भागातील काही तरुणांना व्यसनासाठी खोकल्याचे औषध विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून या दोघा तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून खोकल्याच्या औषधाच्या ३३७ बाटली (प्रत्येकी १०० मिली) साधारण ४७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. येथील तरुणांना गुगींचे व्यसन करण्यासाठी सर्रासपणे खोकल्याचे औषध विक्री होत असल्याची बाब या कारवाईतून उघड झाली. यापूर्वी देखील मालेगाव शहरात व्यसनासाठी सर्रासपणे कुत्तागोळीचा वापर होत असल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहे. पोलिसांनी या दोन ही तरुणांच्या ताब्यातून हा मुद्देमाल जप्त केला असून त्यांनी हा मुद्देमाल कुठून आणला? कसा आणला? याबाबत पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी मिळालेला मुद्देमाल पंचांसमक्ष ताब्यात घेवून औषध निरीक्षक यांना घटनास्थळी बोलवून खोकल्याच्या औषध साठ्याची तपासणी केली. औषध निरीक्षक यांनी खोकल्याच्या औषधाचे नमुने घेतले असून पंच सलीम शहा नादर शहा, कालू शहा हुसेन शहा यांच्या समक्ष ही कारवाई केली. मालेगाव उपविभागीय पोलीस अधीकारी लता दोंदे यांच्या पथकातील पोलीस हवालदार हिरे, सय्यद, आहिरे, निलेश उबाळे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन ही तरुणांसह ४७ हजार रुपये किंमतीचे खोकल्याचे औषध असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आहेर तपास करीत आहेत.



कुत्तागोळी पाठोपाठ खोकल्याच्या औषधाचे व्यसन

मालेगाव शहरात व्यसनासाठी सर्रासपणे कुत्तागोळीचा वापर केला जातो. येथील तरुण व्यसनाच्या आहारी गेले असून शहरातील छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये देखील कुत्तागोळीची बेकायदेशीरपणे विक्री होतांना दिसते. इतकेच नव्हे तर व्यसनासाठी सर्रासपणे खोकल्याच्या गुलाबी रंगाच्या औषधाचा वापर होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने