मालेगाव (मालेगाव लाईव्ह ब्युरो) नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री.गंगाथरन डी. यांचे मार्गदर्शनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण अंतर्गत विशेष मोहिम आज मनपा आयुक्त श्री.भालचंद्र गोसावी, उपविभागीय अधिकारी श्री.विजयानंद शर्मा तहसिलदार श्री.चंद्रसिंग राजपुत, सहाय्यक आयुक्त श्री.सचिन महाले, आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे या त्यांच्या लसीकरण पथकासह सनाऊल्ला नगर येथील यंत्रमाग कारखान्यास अचानक भेट देऊन तेथील कामगारांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासणी केली असता त्या यंत्रमाग कारख्यानावरील कोणत्याही कामगाराचे लसीकरण झालेले नसल्याचे आढळुन आले. तेव्हा सदर यंत्रमाग कारखाना मालकाने मा.राज्य शासनाचे मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन केल्याने सदरचा यंत्रमाग कारखाना सिल करण्यांत आला. उक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उपस्थित सदर कारखाना मालकास तात्काळ लसीकरण करणेचे आवाहन केले असता तेथील सर्वच ०९ यंत्रमाग कारखाना कामगार यांचे तात्काळ जागेवरच लसीकरण करणेत येऊन सदर कारखान्याचे सिल उघडणेत येऊन तेथील कामकाज पुर्ववत सुरु झाले.
तसेच बडी मालेगाव हायस्कुल चे प्राचार्य व सदर संस्थेचे परिसरातील शाहिन कोचिंग क्लास चे संचालक यांचेशी मा.आयुक्त महोदय यांनी स्वत: चर्चा करुन सदरचे शाळेतील सुमारे १००० विद्यार्थ्यांना दिनांक २२/०३/२०२२ व दिनांक २३/०२/२०२२ असे दोन दिवस विशेष लसीकरण मोहिम राबविणेचे निश्चित झाले. दि.१६ मार्च, २०२२ संध्याकाळी १६ यंत्रमाग कामगारांचे विशेष लसीकरण मोहिम अंतर्गत त्यांचे कारखाना स्थळावरच लसीकरण केलेले आहे.
मा.जिल्हाधिकारी महोदय, नाशिक यांचे आदेशा नुसार सदर विशेष लसीकरण मोहिम करिता मालेगाव महानगरपालिका, महसुल विभाग, पोलिस विभाग यांचे विशेष पथक स्थापन केलेले असुन आयुक्त यांचे आदेशानुसार मालेगाव शहरातील सर्व औद्योगिक आस्थापना, दुकाने, यंत्रमाग कारखाना, व्यावसायिक प्रतिष्ठाने येथे लसीकरण पथकासह अचानक भेट देऊन तेथील कामगार, ग्राहक, मालक यांनी त्याचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्राची पडताळणी करणेत येईल. व ज्या औद्योगिक, व्यावसायिक आस्थापनांमधील कामगार,ग्राहक, मालक यांचे लसीकरण झालेले नसल्यास सदरची औद्योगिक, व्यावसायिक आस्थापना तात्काळ सिल करण्यात येईल, तेव्हा मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येते की, ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतलेली नसेल त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात आधारकार्ड/ पॅनकार्ड/वाहन चालविण्याचा परवाना/मतदान ओळखपत्र यापैकी एका कागदपत्राची छायांकित प्रत घेऊन जावी व आपले लसीकरण पुर्ण करुन मनपास सहकार्य करावे, ही विनंती.