📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आश्रमशाळा सौंदाणे येथे महात्मा गांधी स्मृतीदिन व हुतात्मा दिवस विविध उपक्रमांनी साजरा

सौंदाणे (समाधान पवार) आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित गुरुवर्य दादासाहेब बोवा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सौंदाणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतीदिन व हुतात्मा दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. वसंत रामदास बच्छाव होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन सौंदाणे ग्रामपंचायतीचे मा. सदस्य श्री. रामदास आनंदा पवार, प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. काशिनाथ लक्ष्मण गुंजाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
           “मेरा जीवन ही मेरा संदेश है” असे सांगणारे मोहनदास करमचंद गांधी हे विसाव्या शतकावर प्रभाव पाडणारे एक महान व्यक्तीमत्व होते. गांधीजींचे सत्य, अहिंसा, प्रेम, स्वच्छता, स्वावलंबन, स्वदेशी, भुतदया आणि मानवता अशा विचारांना पाईक मानून त्यांनी आपला जीवनमार्ग अवलंबला होता. मानवता आणि अहिंसा हाच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी नव्हे तर आखिल मानवजातीसाठी व्यतीत केले आणि मानवाच्या कल्याणासाठी स्वत:ला वाहुन घेतले. ते जन्माने सामान्य होते परंतु त्यांच्या कार्याने ते जगद-विख्यात झाले. रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना “महात्मा” म्हणून एका पत्रास संबोधित केले, तेव्हापासून ते लहान थोरांसाठी “महात्मा” झाले. असे प्रतिपादन प्रास्ताविकेत श्री. समाधान पवार यांनी सादर केले.    यावेळी विद्यार्थी, शिक्षकांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. श्री. गुंजाळ के. एल., श्रीम. पवार एस. डी., श्री. देवरे डी. एच., श्री. पवार ए. के., श्री. बच्छाव एस. डी. यांनी आपली मनोगत व्यक्त केली. “शिक्षण ही मानवी जीवनावर दिर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे.” असे म्हणत नयी तालीमच्या रुपाने देशाला शिक्षणाची देणगी महात्मा गांधीजींचा स्मृतिदिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या 3H (Heart, Hand and Head) मन, मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकांनी आपल्यात रुजवावा. त्यांनी दिलेले विचार आचारणात आणून आपले जीवन समृध्द करावे असे मार्गदर्शन श्री. गुजाळ सर यांनी याप्रसंगी केले.
          यावेळी महात्मा गांधीच्या स्मृतीदिना निमित्त व हुतात्मा दिनाचे औचित्य साधुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली वाहण्यात आली. तसेच शाळेत विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये महात्मा गांधीच्या आवडीच्या प्रार्थना, भजन यांचे सामुहिक गायन करण्यात आले. स्वावलंबन, सत्कृत्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महात्मा गांधीच्या जीवन चरित्रावर निंबधस्पर्धा आणि अहिंसात्मक वृत्ती काळाची गरज, चलेजाव चळवळ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
          महात्मा गांधी यांनी संपुर्ण जीवनात विविध टप्प्यांवर आपल्या आचारातून आणि विचारांतून दिलेले संदेश एकविसाव्या शतकातही महत्त्वपूर्ण आहेत. 1937 सालच्या वर्धा येथिल शिक्षण परिषदेत त्यांनी “नयी तालीम” शिक्षण पध्दती देऊन आपली शिक्षणविषयक भूमिका मांडली. 7 ते 14 वयोगटातील मुलांना मोफ़त आणि सक्तीचे शिक्षन मिळाले पाहिजे, शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे, शिक्षण हे साध्य नसून साधन आहे, अशी त्यांची भूमिका होती, त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक ठाम विचार होता, जो मानवाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारा आहे. भारताला स्वतंत्र्य राष्ट्र म्हणून घडविण्यात महात्मा गांधी यांचा मोलाचा सहभाग आहे असे मनोगत अध्यक्षीय भाषणात श्री. व्ही. आर. बच्छाव यांनी सांगितले.  यावेळी दोन्ही शाखेचे मुख्याध्यापक, अधिक्षक – अधिक्षिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, समाजकल्याण वस्तीगृह विभागाचे अधिक्षक – अधिक्षिका व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्री. समाधान पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. दिनेश महाले यांनी केले. सदर समारंभ आयोजित करतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सुचनाचे अनुपालन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने