कोरोना प्रतिबंधित लसीविषयी महत्त्वाची बातमी असून या महामारीच्या लढ्यात भारताने मोठे पाऊल टाकले आहे. कोरोना प्रतिबंधित लस आता लवकरच औषधांच्या दुकानात (मेडिकल स्टोअर्स) मिळणार आहेत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लवकरच रुग्णालयांबरोबरच आता औषधांच्या दुकानात कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसी मिळणार आहेत. या लसींची खुल्या बाजारात विक्री करण्यास परवानगी देण्याची शिफारस केंद्र सरकारच्या विशेष समितीने केली आहे.
बुधवार, १९ जानेवारी रोजी केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञांची विशेष समितीची बैठक झाली. या बैठकीत समितीने कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी खुल्या बाजारात विकण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताचा कोरोना लढा आणखी भक्कम होणार आहे. केंद्र सरकारमधील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. देशात सध्या या लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आलेली आहे.
आता लवकरच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेक या दोन लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लसी रुग्णालये आणि औषधांच्या दुकानात उपलब्ध करून देता येतील. सरकारच्या कोवीन पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सना लस विक्रीची मुभा असणार आहे.
Tags
vaccination