सटाणा HDFC शाखेतील तब्बल 1 कोटी 4 लाख 45 हजारांचा घोटाळा उघडकीस आला असून, यात एकूण 31 शेतकऱ्यांना गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे बँकेने सटाणा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार केली. मात्र, पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्याने त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
नेमकी घटना काय?
HDFCबँकेच्या सटाणा शाखेत पीक कर्ज विभागात हा घोटाळा झाला आहे. बँकेतील संशयित कर्मचारी मनोज दिलीप मेधने (रा. सरस्वतीवाडी, ता. देवळा) आणि शरद शिवाजी आहीरे (रा. इंदिरा नगर, सोयगाव, ता. मालेगाव) यांनी हा घोळ केला. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत ग्राहकांना चुकीची माहिती दिली. खोटे आणि बनावट दस्तावेज दिले. बँकेत आर्थिक अनियमितता केली. त्यातून बँकेच्या ग्राहकाकडून बेकायदारित्या रक्कम घेतली. या घोटाळ्याचा कर्ताकरविता मनोज मेधने याने साथीदारासोबत अतिशय नियोजनबद्धरित्या बागलाण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना गंडा घातला. जवळपास 31 शेतकऱ्यांची एक कोटी पाच लाखांची फसवणूक केली.
पोलिसांची टाळाटाळ
सटाण्यातील शाखेतील घोळाची कुणकुण बँकेला लागली. त्यांनी तातडीने सटाणा पोलीस ठाण्यासह तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली. सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी, नाशिकची स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडेही धाव घेतली. 19 सप्टेंबर 2021 रोजी तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी या अतिशय गंभीर असणाऱ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.
न्यायालयात धाव
पोलिसांनी साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे बँकेने शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. एचडीएफसी बँकेचे प्राधिकृत अधिकारी विशाल पठाडे यांनी वकील ए. के. पाचोरकर यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने 153 (3) अन्वये आदेश द्यावा, अशी विनंती केली. मात्र, त्या दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. शेवटी मंगळवारी या प्रकरणी दोन्ही पक्षांनी युक्तिवाद सादर केले. त्यानंतर न्यायाधीश ए. एस. कोष्टी यांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 2 जुलै 2014 रोजी अर्नेसकुमार विरुद्ध बिहार सरकारच्या खटल्याच्या निकालाचा आधार घेतला.
अखेर संशयितांना बेड्या
न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर पोलिस निरीक्षकांनी संशयित मनोज मेधने आणि शरद शिवाजी आहिरे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, या साऱ्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. बँकेने तक्रार दाखल करूनही साधी चौकशीही केली नाही. विशेष म्हणजे त्यासाठी बँकेला कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागला. याबद्दल फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
साभार tv9