📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

माय बापहो! मी मालेगांव बोलतोय... : प्रा. अनिल देवरे

 माझे शीर्षक पाहताच कदाचित तुम्ही मला काय सांगायच आहे, बोलायचं आहे हे ही समजून घेणार की नाही ,यातही मला शंका आहे... इतकं मला कलंकित,शापित करून टाकलं आहे,,मी आधीच दंगल,बाँबस्फोट,लोकसंख्या विस्फोट चे हकनाहक लत्ताप्रहार झेलून राहिलो...त्याच्यानेच गर्भगळीत,जराजर्जर झालेला मी आता कोरोनामुळे शासनदरबारी जगण्याची भीक मागत आहे..मदतीची याचना करत आहे,,,,
     आधीच बदनाम झालेल्या(का केलेल्या) माझ्यासारख्या अभाग्याकडे शासन किती काळजीने बघेल यातही मला शंका आहे, काळजीही आहे.माझ्यावर संकट आल्यावरच फक्त देशातील, राज्यातील, नेत्यांचे तथाकथित न्युज चॅनेल्स वाल्याचे लक्ष जाते हे आणखी एक माझे दुर्भाग्य,, हेच लक्ष आधी गेलं तर कदाचित माझी जितकी हानी,मानहानी आणि बदनामी होते तितकी होणार नाही हे कोण समजवणार ह्या नतद्रष्टाना,,,
    कारण कमी जागेत थाटलेल्या तकलादू,जीवघेण्या संसारात मी आधीच गुदमरत आहे.मला मोकळा श्वास घेण्यासही जागा नाही.यातही कमी की काय घाणीचे,रोगराईचे,सांडपाण्याचे साम्राज्य,त्यातही दृष्टिहीन नेत्यांची भर म्हणजे मी आतूनही बाहेरूनही पोखरलाच जात आहे असे मला खेदाने म्हणावेसे वाटते....
  पण असे जरी असले तरी मी उभा आहे कारण मी संघर्षशील आहे,, माझा स्वभाव लढवय्या आहे ,,मी स्वकीयांचा घात, परकीयांचा(शासनकर्ते) विश्वासघात अन राजकीय,सत्तातूर लोकांनी घडवून आणलेल्या दंगलींचा आघात,प्रतिघाताच्या बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मपितामह सारखा या (महा)भारताच्या रणभूमीवर सत्तामोहापायी आंधळ्या झालेल्या व्यवस्थेशी,राज्यकर्त्यांशी झुंजत आहे,,,आणि जुंझतच राहणार
     मला माहित आहे माझा लढा स्वकीयांशीसुद्धा  आहे,,,शुशोभीकरणाच्या,रस्ता, सांडपाणी,मौसम चौपाटी,साफसफाई, शहर सुधारणेच्या नावाने मिळणाऱ्या निधीतल्या टक्केवारीने माझी अतोनात हताशा, निराशा अन दुर्दशा केली आहे मात्र माझ्या नावाने पैसे 'खाणाऱ्यां'पेक्षा माझ्या सौंदर्यात भर कशी पडेल असा उदार विचार करून त्यासाठी पैसे 'देणाऱ्या' त्या दाणी अन निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या माझ्या 'तरुआई'च्या लेकरांकडे मी दुर्लक्ष कसे करू,,,माझ्यासाठी असेही निष्काम भावनेने काम करणारे कितीतरी सेवेकरी माझ्यात वास्तव्य करत आहेत,,,,
      दंगलीमुळे दोन धर्मियांत  निर्माण झालेल्या तेढातून राजकीय फायदा घेणाऱ्या लोकांपेक्षा दोन धर्मीयांत सलोखा,सद्भावना, एकोपा कसा वाढेल यासाठी झटणाऱ्या माझ्या हिंदुस्थानी एकता मंच,शहर शांतता कमिटी,भाईचारा ग्रुप सारख्या मानवतावादी लेकरांना मी कसे विसरू,,,अश्याच माझ्या लेकारांकडून,सेवेकऱ्याकडून मला खूप आशा आहेत,,त्यांच्या साहसावर,विश्वासावर माझे अस्तित्वा अबाधित आहे आणि राहिलही,,,
      बिगडणारी पिढी,नासणारे तारुण्य,भरकटलेल्या,भटकलेल्या मुलांना,,हातावर पोट भरणाऱ्या गोर गरिब,पीडित, मुलांना शिक्षण,संस्काराचे,रोजगार,स्वयंरोजगाराचे धडे देणाऱ्या त्या ,के.बी.एच,आर बी.एच,पी.व्ही.एच,मसगा महाविद्यालय,काकाणी, काबरा,जेएटी,ए.टी.टी,खातून,मदर आयेशा,वर्धमानसारख्या कितीतरी शाळा कॉलेजांचे माझ्या वैभवात भर टाकणारे योगदान मी कसे कमी लेखू,,,यासर्वांकडे पाहिले की मला लढण्याच बळ मिळत,,उज्वल भवितव्याची खात्री मिळते,,

     हजारो कुटूंबातील लाखो जीवांना जीवदान देणाऱ्या दोन वेळची रोजी रोटीचा प्रश्न सोडवण्या बरोबरच देशात तसेच राज्यात माझ्या(मालेगावच्या) पुढारलेपणाचा उद्यमशीलतेचा डंका वाजवणाऱ्या त्या यंत्रमागाचे योगदान नजरेआड कसे करू,,,,
     माझ्याकडे सांगण्यासारखं फार आहे... मात्र तुम्हाला माझं ऐकावं ,मला समजून घ्याव अश्या मानसिकतेत ठेवलेच नाही,,तरीही मी विनंती करतो की मला बदनाम करू नका,,माझे वाईट काय आहे तेवढंच दाखवू नका ,सांगू नका,,माझी जी लेकरं हातावर पोट भरतात त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल,जी माझी लेकरं शिकण्यासाठी,नोकरी, कामधंद्यासाठी दुसऱ्या शहरात,राज्यात,देशात  जातात,वास्तव्य करतात त्यांच्याकडे तेथील लोक अपराधी भावनेने,कलंकित नजरेने बघतील...माझी ती मुलं लई मेहनती आहेत हो!...फार गुणी आहेत...त्यांना नाउमेद करू नका...तुम्ही त्यांच्याशी मैत्री करून पहा, त्यांच्यावर विश्वास ठेवून बघा ,तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होतील,,म्हणून म्हणतो त्यांना अपराधी वाटेल असे काही माझे म्हणजेच मालेगावचे  चित्र रंगवू नका,,नाहीतर कोणी चांगला अधिकारी येथे येणार नाही,,कोणी उद्योग धंदे उभारण्याची हिम्मत करणार नाही,,मोठी गुंतवणूक करणार नाही
     माझ्या जखमा, माझे दुखणं,माझा आजार दूर करून मी निरोगी कसा होईल यासाठी प्रयत्न करा,नुसत्या चूकाच दाखवू नका,,माझ्या आजाराचं भांडवल करू नका त्यासाठी भांडवल द्या...मी आधीच उपेक्षित आहे,दुर्लक्षित आहे...त्यातही विविध जाती,धर्माची माझी लेकरं एकमेकांच्या आधाराने आपली पोटं भरतायेत,, भाजीपाला,फळे,दूध,अंडी ,मांस यासारख्या छोट्या छोट्या उद्योगातून त्यातून मिळणाऱ्या रोजगार,अर्थार्जनातून त्यांचे पोरं बाळ कुटुंब कसेबसे तग धरून आहे,,आता त्यांचे जीवन परस्परावलंबी झालेले आहे...काही वेगळं चित्र निर्माण करून त्यांना भिकेस लावू नका,,,माय,बाप हो ! ही हात जोडून विनंती...नाहीतर काळ तुम्हाला माफ करणार नाही,,,
     मी अनेक संकटातून तरुण गेलो आहे, या ही संकटातून तरुण जाईल फक्त माझी प्रतिमा मलिन करू नका त्यातून तरायला मला जास्त वेळ लागतो...म्हणून मी करुणा भागतो,,मी मालेगाव आहे, मला भावना आहेत,मला संवेदना आहेत,माझ्याही आशा अपेक्षा आहेत,,मलाही उज्वल भविष्याची स्वप्न पडतात.. म्हणून निर्दयपणे त्यावर नकोनको ते शिक्के मारून माझ्या भावनांशी खेळू नका,,माझ्या स्वप्नांचा बाजार मांडू नका एवढंच सांगणं आहे,,
    माझे  ऐतिहासिक,भौगोलिक,सांस्कृतिक वैभव जाणून घ्या तुम्ही माझ्या प्रेमात पडाल,,माझ्या माणसांशी नातं जोडून पहा नात्यातली इतकी जिंदादिली, आपलेपणा तुम्हाला शोधून सापडणार नाही,,,ती पण 

जिंदगीके साथ भी,,और जिंदगी के बाद भी

प्रा. अनिल देवरे, मालेगाव

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने