मालेगाव ( मनोहर शेवाळे) वाहन धुण्यासाठी गेलेला मुलगा पूरपाण्यात वाहून गेल्याची दुर्घटना गुरुवारी सायकाळच्या सुमारास टेहरे पुलाजवळ घडली होती
अविनाश मोतीराम बच्छाव (रा.टेहरे) हे आपल्या भावासह, मुलगा सौरभ अविनाश बच्छाव (११) नदीकाठावर आपली गाडी धुण्यासाठी गेले असता सौरभ चा पाय घसरुन पडल्याने सौरभ पाण्याच्या प्रवाहात खेचला गेला, दोन्ही भावांना पोहता येत नसल्याने त्यांनी प्रयत्न करूनही त्याला प्रवाहातून बाहेर काढता आले नव्हते, ही घटना समजताच पंचायत समिती सदस्य अरुण माऊली पाटील यांनी अग्निशमन दलाला या घटनेबाबत माहिती दिली अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोचून तीन कर्मचारी टेहरे पुल आणि तीन कर्मचारी गिरणा पुलाजवळ सौरभचा शोध घेऊ लागले, मात्र रात्र झाल्याने अंधारात बचावकार्याला अडथळा निर्माण झाला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा पासून सायंकाळ पर्यंत पुन्हा दिवसभर अग्निशमन दलातर्फे सौरभचा टेहेरे पुलापासून गिरणा डॅम पर्यंत शोध घेण्यात आला परंतु सौरभ मिळून आला नव्हता,
आज सकाळी सवंदगाव शिवारात सौरभ मृतावस्थेत आढळून आला, सौरभ लहान असल्याने व पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगात असल्याने त्याला पोहता येत नव्हते, त्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन सौरभचा दुर्दैवी मृत्यू झाला,
सौरभला शोधण्यासाठी दोन दिवसांपासून अग्निशमन दल अधीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शकील अहमद, विकास बोरगे, कृष्णा कोळपे, राहुल जाधव, निजाम शेख, शकील अहमद शेख प्रयत्नशील होते.
या घटनेची माहिती सवंदगाव चे पोलीस पाटील अमोल नवसरे यांनी दिली, माहिती कळताच पंचायत समिती सदस्य अरुण (माऊली ) पाटील यांनी सौरभ च्या नातेवाईकांसह धाव घेतली,
शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल, या दुर्दैवी घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे