मनोहर शेवाळे | मालेगाव
( संपादक: मालेगावचा वृत्तवेध )
🛑 या गुन्हेगारांना आश्रय कोणाचा?
🛑 कोण देणार उत्तर?
🛑 तीन बंगल्यांची खरेदी-विक्री झाली कुठे? 🛑 मालेगावकरांना हवी उत्तरे
गुजरात राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एबीसीबी) विभागाने केल्या कारवाईत ड्रग्ज माफिया रुबिना शेख हिला अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर रुबिना शेखची मालेगाव शहरात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. मालेगाव शहरात आंमली पदार्थ विक्रीचे अनेक प्रकार यापूर्वी अनेकदा उघड झाले आहे. त्यात रुबिनाच्या अटकेनंतर मालेगाव शहराची ओळख यापुढे ड्रग्ज माफियांचे शहर म्हणून झाल्यास वावगे तर ठरणार नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मालेगाव शहरात कुत्ता गोळी, भांग, गांजा, चरस आदी नशेचे पदार्थ मालेगाव शहरात सर्रास विक्री होते. इतकेच नव्हे तर कप सिरफ या औषधाचा देखील मालेगाव शहरात नशेसाठी आमंली पदार्थ म्हणून वापर होतो. या नशेचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांमध्ये अनेकदा गॅँगवार देखील झाले आहे. यात सर्रासपणे गावठी कट्टे, पिस्तुल, काडतुसे, हत्यारे आदींचा वापर झाल्याचे उघडकीस झाले आहे. सर्वसामान्य मालेगावकर जनतेला वेठीस धरण्याचे काम या माफियांकडून यापूर्वी झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या माफियांकडून शहरातील अनेक व्यावसायिक तसेच व्यापाऱ्यांची आर्थीक लूट देखील झाली आहे. पोलिसांकडून अनेकदा जुजबी कारवाई करुन यांच्याकडून अनेक प्रकारचे नशेचे पदार्थ जप्त केले आहेत. मात्र गुन्हेगारीचा पायमुळे कधीही खोदून यांचा कायमचा बिमोड करण्यात आलेला नाही. भविष्यात मालेगाव शहरात मालेगाव शहरात ड्रग्ज माफियांचा उच्छाद पहायला मिळू शकतो. पोलिसांनी वेळीच कारवाया केल्या नाही तर मालेगाव शहरात यापूर्वी दंगली झाल्या आहेत, बॉम्बस्फोट झालेला आहे. यापुढे ड्रग्ज माफियांकडून मोठ्याप्रमाणात रक्तपात देखील होवू शकतो, असे मालेगाव शहरातील जाणकारांचे मत आहे.
----------
मालेगाव शहरात मोठ्याप्रमाणात कुत्ता गोळीची नशा केली जात असलेले आतापर्यंन्त अनेकदा कारवाईंमध्ये उघड झाले आहे. कुत्तागोळी, व्हाईटनर, एम.डी., गुटखा आदींचा नशाचा विळखा शहराला बसत असतांनाच मालेगाव शहरात आता ड्रग्ज माफियांचे वास्तव्य असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एबीसीबी) विभागाने केल्या कारवाईत अटक करण्यात आलल्या रुबिना नियाज शेख हिचे मालेगाव शहरातील उच्चभू वस्तीत तीन प्रशस्त बंगले असल्याने तीचे मालेगाव शहरात वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एबीसीबी) च्या पथकाने गुजरात राज्यातील उंझाजवळील मीरादातार येथून ड्रग्ज माफिया रुबिना नियाज शेख हिला ताब्यात घेतले. या कारवाईत तिचा एक साथीदार निलोफर सांडोले अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या टोळीकडून कामगारवस्तीतील तसेच गोरगरीबांच्या झोपडपट्टीतील रहिवांशाना व्यसनाधिनतेच्या मार्गाला लावले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पथक त्यांच्या मागावर होते.
एबीसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या रुबिना शेखची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान रुबिनाने अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराचा समावेश आहे. ड्रग्ज माफिया रुबिना हिच्या मालमत्तेची पथकाने चौकशी केली असता तिचे मालेगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीत तीन प्रशस्त बंगले असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मालेगावात तिचे वास्तव्य असेल त्यामुळे तिने येथे तीन बंगले घेतले असावेत याशिवाय मालेगावात कुत्तागोळी पाठोपाठ ड्रग्ज, एम.डी. आदी आमंली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे यातून सिद्ध होत असल्याची चर्चा आहे.
आजवर मालेगाव शहरात कुत्तागोळी विक्री व सेवन करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे अनेकदा तपासात उघड होत होते. मात्र एबीसीबीच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे मालेगावात ड्रग्ज तसेच आमंली पदार्थ व्रिकीसाठी माफियांने वास्तव्य बनविले असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे मालेगाव शहरात आमली पदार्थ, कुत्ता गोळी विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध कारवाई करण्याचे मोठे आवाहन मालेगाव पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दरम्यान ड्रग्ज माफिया रुबीनाचे मालेगावात तीन बंगले असल्याची वार्ता समजतात संपूर्ण शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान वर्षभरापूर्वीच तिने हे बंगले व जमिन खरेदी केली असून याठिकाणी ती काही दिवस वास्तव्यास होती, अशी कुणभूण लागत आहे. मालेगाव शहरात आंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीने आपले पायमुळे घट्ट करण्याची तयारी केली असल्याचे रुबिना शेख च्या अटकेने सिद्ध झाले आहे. जर रुबिना शेख मालेगावात वास्तव्यासाठी बंगले, मालमत्ता घेवू शकते आणि मालेगावच्या पोलिसांना त्याची कुणभूण देखील नसावी यावरुन मालेगाव पोलिसांच्या कार्यकौशल्यतेवर प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुन्हेगारीला अळा बसविण्यासाठी अनेक विशेष पथकांची नेमणूक झाली असली तरी मालेगाव शहरात राष्ट्रीय तपास यंत्रणा देखील कार्यरत आहे.
असे असतांना देखील मालेगाव शहरात मागील वर्षभरात अनेक गुन्हे हे आर्म ॲक्टचे दाखल झाल्याची माहिती उघड झाली आहे. तरीदेखील मालेगाव पोलिसांना मात्र याची खबरबात नव्हती. या कारवाईनंतर देखील गुन्हेगारीचे मुळ शोधण्यात मालेगाव पोलिसांना यश आलेले नाही. शहरात गोळीबाराच्या अनेक घटना झाल्या आहेत. अनेक गावठी कठ्ठे (काडतूसे) जप्त करण्याच्या कारवाई यापूर्वी झाल्या आहेत. जवळपास शहरातील व ग्रामीण भागातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये यासारख्या मोठ्या गुन्ह्यांची नोंद असतांना तपास मात्र थांबतो कुठे? हा ही एक मोठा प्रश्न मालेगावकर जनतेसमोर उभा राहिला आहे. मागील काही काळात दहशत वादी पथकाने अनेक कारवाया देखील मालेगावात केल्या आहेत आणि आता नाशिक व इतर ठिकाणाहून एटीएसने दहशतवादी पथकाच्या अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. यावरुन मालेगावात अशाप्रकारचे मोठ्याप्रमाणावर गुन्हेगारांचे नियमित वास्तव्य असेल तर स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या कामावर प्रश्न निर्माण झाला आहे. जर वेळीच पोलिसांनी या गुन्हेगारीला अळा घातला असता तर आज मालेगाव शहर पुन्हा गुन्हेगारी क्षेत्रात चर्चेत आले नसते.
मालेगावात रुबिनाला कोणाचा आश्रय?
ड्रग्ज माफिया रुबिना शेखची मालेगावतील संपत्ती व लागेेबंधे सिद्ध झाले असले तरी याबाबत मालेगाव पोलिसांनी अजुनही अधिकृतपणे काही माहिती दिली नाही. मग रुबिनाला कोणाचा राजकीय वरदहस्त लाभलेला आहे का? मालेगाव पोलिसांनी कारवाई करण्यापासून कोण रोखते आहे? याबाबत अजुनही काही ठोस माहिती मिळू शकली नाही. रुबिनाने मालेगावात सर्वप्रथम प्रवेश घेण्यासाठी कोणाचा आश्रय घेतला ाहे. याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मालेगावकरांचे मत आहे.
मालेगावची संपत्ती चर्चेत
ड्रग्ज माफिया रुबीना शेख हिची मालेगावात कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून शहरालगत असलेल्या सायने शिवारात गट क्र. ४६/३४ मध्ये पाच हेक्टर क्षेत्र तिच्या नावावर आहे. तसेच उच्चभ्रू वस्तीत तीन प्रशस्त बंगले असल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात ड्रग्ज माफियांची असलेली ही संपत्ती चर्चेत आहे.
मालेगाव पोलीस अनभिज्ञ
मुंबईच्या एबीसीबीच्या पथकाने ड्रग्ज माफिया रुबिना शेख हिला अटक केली. तपासात तिचे मालेवातील उच्चभ्रू वस्तीत कोट्यवधी रुपये किंमतीचे तीन प्रशस्त बंगले असल्याची माफिती उघड झाली आहे. मात्र याबाबत शनिवारी (दि.२) दुपारी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्याशी चर्चा केली असता त्यांना वरीष्ठ पातळीवरुन अजून कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

