प्रशांत गिरासे | नाशिक
नाशिक शहरात क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, सदर घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल रविवार ता. १० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशकातील सिडको मधील उंटवाडी भागातील रणभूमी मैदान मध्ये क्रिकेट खेळत असताना श्रेयस सुधीर ढोरे (15) रा. कालिका पार्क या मुलाला अचानक चक्कर आली व तो खाली कोसळला, व बेशुद्ध पडला हे बघून त्याच्या सोबत खेळणाऱ्या मित्रांनी तात्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, मात्र इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच श्रेयस ने प्राण सोडले होते, डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले, सदर दुर्दैवी घटनेने ढोरे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला त्यांच्या आईवडील व नातेवाईकांचा आक्रोश बघून इतरांनाही अश्रू अनावर झाले.
दुर्दैवी श्रेयस अत्यंत उत्कृष्ट क्रिकेट पटू होता, त्याने अनेक स्पर्धामध्ये अनेक पारितोषिके मिळविली होती , देशपातळीवर खेळण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले असून आम्ही आमच्या एका जिवलग मित्राला गमावल्याने आमचे खूप नुकसान झाल्याची भावना श्रेयस च्या मित्रांनी व्यक्त केली, याप्रकरणी पुढील तपास अंबड पोलिस स्टेशनचे हवालदार श्री. बोंबले करीत आहेत.