🔴 जय योगेश पगारे
सध्या व्हाट्सअप वर एका मेसेजने मोठा धुमाकूळ घातला आहे, आणि हा मेसेज फॉरवर्ड करण्याचा नुसता कहरच झाला आहे.
🎉🎉Tata Groups. 150th Anniversary Celebration!!🎊🎊
Click on the link to participate in the event to win a car! ! ! !
अशा आशयाचा एक मॅसेज सध्या आपल्या सर्वांना आपल्या मित्र नातेवाईकांकडून नक्कीच आला असेल, आणि नेहमीप्रमाणे आपल्या पैकी बऱ्याच जणांनी या लिंक वर क्लिक करून आत्तापर्यंत हा मेसेज आपल्या अनेक कॉन्टॅक्ट तसेच ग्रुपवर फॉरवर्ड ही केला असेल, नकळत आपणच गुन्हेगारांना आपली सर्व माहिती अत्यंत दानशूरपणे दिली असल्याची साधी चुणूकही आपणास नसेल,
सकाळपासून व्हाट्सअप वर अशा आशयाचा मेसेज फिरत होता, अनेक जण मोठ्या उत्साहाने आपल्याला कार मिळेल या आशेने ते फॉरवर्डही करीत होते, यानंतर पुढे ज्यांना मेसेज मिळाला त्यांनी त्या लिंक वर क्लिक केल्यावर आपसुकच त्यांच्याकडूनही हा मेसेज पुढे पुढे फॉरवर्ड होत होता, परंतु या मेसेज मध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे स्वतः टाटा ग्रुप ने ट्विट करून प्रसारित केले आहे, पोलिसांकडूनही या ट्विट चा संदर्भ देत सदर मेसेज खोटा असून हा हॅकिंगचा नवीन प्रकार आहे असे सांगितले, ज्यामध्ये वायरस असून जर कोणी या लिंक वर क्लिक केले तर ते एका विशिष्ट वेब पेजवर जातात यामध्ये टाटा ग्रुप आपल्या 150 व्या वाढदिवसानिमित्त लोकांना मोफत कार वाटत आहे असे स्क्रीनवर दिसते
या पेज वर चार अत्यंत सोपे प्रश्न विचारले जातात व शेवटच्या पेजवर तुम्हाला हा मेसेज आपल्या पाच ग्रुप किंवा कॉन्टॅक्टमध्ये शेअर करण्यास सांगितले जाते, उत्साहाच्या भरात आपण हा मेसेज सहजपणे इतर लोकांसोबत अथवा ग्रुप मध्ये शेयर केला असेल, परंतु एवढ्या वेळात हॅकर्स ने कदाचित तुमच्या फोन मध्ये विशिष्ट प्रकारचे मालवेअर किंवा व्हायरस पाठवलाही असेल, ज्यामुळे तुमच्या फोन मधील डाटा व आर्थिक बाबींच्या सुरक्षिततेस धोका पोहोचला असेल.
नेहमी कुठलाही मेसेज आल्यास तो फॉरवर्ड करण्याआधी किंवा त्यावर भरवसा ठेवण्याआधी त्याची विश्वासार्हता व सत्यता पडताळून बघावी,
अन्यथा सध्या बँकिंगचे जेवढे फ्रॉड सुरू आहेत त्यातीलच हा एक नवीन प्रकार असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे ज्यामुळे गुन्हेगार आपल्या फोनमधील माहिती व ॲप्सच्या माहितीचा दुरुपयोग करू शकतात.
मालेगाव लाइव्ह नेहमीच अशाप्रकारच्या फेक मॅसेजची शहानिशा करून आपल्या वाचकांना याबाबत सविस्तर माहिती देत असते.
त्यामुळे सर्वांनी या अशा गोष्टींच्या जाळ्यात न फसता सूचकता दाखवावी व आपल्या जवळ असा काही मेसेज आला असल्यास तात्काळ डिलीट करावा जेणेकरून आपली माहिती कुणा अनोळखी हॅकर्सच्या हातात जाऊन आपल्याला आर्थिक फटका बसणार नाही याची काळजी घ्यावी.
दूरसंचार मंत्रालयाने यापैकी बर्याचशा लिंक निष्क्रिय केल्या आहेत, आपल्याकडे अशी काही लिंक असल्यास त्वरित डिलीट करून टाकावे.