📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी शहाजी उमाप

नाशिक - नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी राष्ट्रपती पदक विजेते शहाजी उमाप यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर विद्यमान पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहर पोलिस आयुक्तालयाती सहाय्यक पोलिस आयुक्त समीर नजीर शेख यांची मुंबई विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी सिद्धेश्वर बाबुराव धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने आज सायंकाळी भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस अधीक्षक, तसेच राज्य पोलीस सेवेतील सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह सचिव कैलास गायकवाड यांनी काढले. राज्यातील ३१ पोलीस अधीक्षक, ५४ अप्पर पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त, ९२ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान कडक व शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाप यांनी विविध ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. राज्यात १९९६ मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते उपअधीक्षकांत प्रथम आले होते. आंबेजोगाई, लातूर, कोल्हापूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून तसेच कोल्हापूर व नांडेड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत २०१२ मध्ये तंटामुक्ती योजनेत नांदेड जिल्हा राज्यात प्रथम आला होता. एक हजारांहून अधिक गावे त्यांनी तंटामुक्त केली होती. पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई येथेही त्यांनी पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहिले. त्यांना या आधी पोलिस महासंचालकांचा सन्मानचिन्ह मिळाले आहे.
उमाप हे कुटुंबीय पुण्याजवळील शिक्रापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू कांतिलाल उमाप हे राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त आहे. दुसरे बंधू सुभाष उमाप हे शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. तिसरे बंधू राजेंद्र हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. चौथे बंधू संभाजी हे सहायक विक्रीकर आयुक्त आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने