नाशिक दि. 15 सप्टेंबर 2021 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा)
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीकरीता असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, इन्क्युबेशन सेंटर, पायाभुत सुविधा, ब्रॅडिंग व विपणन, क्षमता बांधणी व संशोधन प्रशिक्षण संस्थेबाबत जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी 20 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषि विभागाच्या http://pmfme.mofpi.gov.in किंवा http://pmfme. mofpi.gov.in /mis/#/login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत “एक जिल्हा एक उत्पादन” या घटकांमध्ये कांदा या पिकाची निवड करण्यात आली आहे. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के पर्यंत व जास्तीत जास्त 10 लाख रूपये मर्यादेत प्रती प्रकल्पासाठी तसेच सध्या कर्यरत असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्प, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट यांना अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अटी व शर्ती याबाबतची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक यांच्या कार्यालयात तसेच www.krushi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.