जामनेर (जय योगेश पगारे) आजच्या हायटेक युगातही अनेक जण अंधश्रद्धांना बळी पडतात, यामुळे भोंदूबाबा मंडळींचे फावते, जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी भागात आपला धंदा चालावा म्हणून जमील शहा आयुब शहा उर्फ सलमान बाबा नामक भोंदूबाबाने चक्क भुताचे व्हिडिओ स्वतःच शूट करून ते खरे असल्याचा बनाव करीत परिसरात वायरल केले, अर्थात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व या नंतर ही बनावटगिरी समोर आली, संबंधित प्रकार हा जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहुर येथील आहे. भुतांचा कथित व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तिघांना फत्तेपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपलं कृत्य कबूल केलं. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या या कृत्यामुळे पहूर, फत्तेपूर, देऊळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
व्हाट्सअप वर व्हायरल होत असलेला, आपण पाहात असलेला हा व्हिडिओ कोणत्याही भुताबिताचा नसून जामनेर तालुक्यातील एका बिलंदर बाबाने तयार केलेला आहे, जमील शहा आयुब शहा उर्फ सलमान बाबा याने आपल्याकडील ताईत आणि गंडेदोरे विकण्यासाठी चक्क शिर नसलेल्या व त्यासोबत महिला भुताचा व्हिडिओ आपल्याच साथीदारांसह शूट करून परिसरात वायरल केला, यासाठी त्याने दोन जणांना तोतया भूत बनवून त्याचे शूटिंग केले ज्यामध्ये एका मुलाला नग्न अवस्थेत व चेहऱ्यावर काळे कापड बांधून व दुसऱ्या व्यक्तीला साडी नेसवून रस्त्यावर चालायला लावले व हे शूटिंग खरे वाटावे म्हणून ते कार मधून शूट केल्याचा बनाव करण्यात आला त्यांनतर भोंदूबाबा चक्क हिंदू-मुस्लिमांचे चे मंत्र म्हणून त्या भूताना दूर सारत असल्याचा बनाव देखील करण्यात आला, हा व्हिडिओ जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी परिसरात बनविण्यात आला, त्यामूळे परिसरात एकच खळबळ उडाली, पोलिसांनी याची दखल घेतल्यावर, तपासाची चक्रे फिरवली व हा प्रकार सलमान बाबाने केल्याचे उघड झाल्याने त्याच्या विरोधात जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा सर्व प्रकार अंधश्रद्धेचा असून कोणीही त्याला बळी पडू नका आणि हा व्हिडिओ बनावट असल्याने तो खरा असल्याचे भासवून फॉरवर्ड करू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणाची मालेगाव लाईव्हनेही गंभीर दखल घेतली, व कसून शोध घेतला असता व्हिडिओ साफ बनावट असल्याचे दिसून येते, बऱ्याच लोकांना अंधश्रद्धेपोटी जे दिसत नाही ते आमच्या डोळ्यांना दिसते, कोणत्याही वायरल गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्याचे काम मालेगाव लाइव्ह नेहमी करत असते हा व्हिडीओ बघूनही बरेच प्रश्न मनात उपस्थित होतात,
* सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमकं भूत समोर दिसण्याच्या वेळीच सदर लोकांनी कॅमेरा कसा चालू केला?
* दुसरी गोष्ट भूत रस्त्यावर काय करत होते? ज्याप्रमाणे भुताच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याप्रमाणे समोर जर खरच भूत दिसले तर वाहनातील वाहनातील लोकांची काय अवस्था होईल?
* समोरून गाडीचा उजेड असताना भूत गाडीवर धावून का आले नाही?
* गाडीतील लोकांनी अर्धवट शूट का केले? गाडी आणखी पुढे नेऊन किंवा अपर बिमचा प्रकाश पाडून आणखी स्पष्ट होऊ शकले असते, पण तसे का केले नाही?
* याशिवाय सदर भूत एकमेकांचे हात धरून चालताना अत्यंत सावकाश चालत होते यामध्ये उलटे चालणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित चालता येण्यासाठी ते हळू हळू चालत होते
असे अनेक प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे प्रथमदर्शनी हा व्हिडीओ एखाद्या वेब सिरीज साठी किंवा खानदेशी शॉर्टफिल्म साठी तयार केला असल्याचे जाणवले होते परंतु सदर परिसरातील ओळखीच्या लोकांशी संवाद साधल्यानंतर लक्षात आले की हा व्हिडीओ परिसरात व्हायरल होत आहे व जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठिकाणाचा यात उल्लेख आहे,
त्यानुसार आम्ही फोन द्वारे फत्तेपूर ( जामनेर) पोलिसांशी संपर्क केला, त्यांच्या म्हणण्यानुसार,
भोंदूबाबाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने मुद्दाम अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केला आहे त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर भोंदू बाबाला अटक केली आहे.
जगात भूत-पिशाच असा कोणताही प्रकार नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, व तसेच अशाप्रकारचे व्हिडीओ व्हायरल करुन लोकांमध्ये भीती निर्माण करु नये. कुणी तसा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते”, असा इशारा संजय बनसोड यांनी दिला
काय आहे या व्हिडिओत बघा तुम्हीच: