चंद्रपूर (जय योगेश पगारे) चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना या छोट्याश्या गावातील एका आईची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. चर्चेमागं कारणही अगदी तसंच आहे. जुनोना गावात राहणाऱ्या अर्चना संदीप मेश्राम या माऊलीने एका भल्यामोठ्या वाघाच्या जबड्यातून आपल्या मुलीला बाहेर काढत तिचा जीव वाचवला आहे. मुलीसाठी स्वतःच्या जिवावर उदार होणारी ही माऊली मुलीला उपचारासाठी शुक्रवारी नागपूरमधील शासकीय रुग्णालयात घेऊन आली. त्यावेळी तिने डॉक्टरांना सर्व घडलेली घटना सांगितली. यानंतर डॉक्टरांनीही तिच्या धैर्याला सलाम ठोकला आहे.
जुनोना हे गाव चंद्रपूर पासून जवळपास 7 किमी अंतरावर आहे. पहाटे साडेपाच वाजता अर्चना शौचासाठी जंगलाकडे निघाल्या होत्या. आईच्या पाठीमागे त्यांची पाच वर्षांची मुलगी देखील निघाली. मात्र, यावेळी एका झुडपात लपून बसलेल्या वाघाने छोट्या मुलीवर हल्ला चढवला. मुलीने आई म्हणून जोरात आरोळी देताच अर्चना यांनी मागे वळून पाहिलं, तर त्यांच्या मुलीचं डोकं वाघाच्या जबड्यात होतं.
वाघाच्या जबड्यात आपल्या मुलीला पाहून अर्चना सुरुवातीला घाबरल्या. परंतु नंतर त्यांनी सर्व शक्ती एकवटून जवळ पडलेली बांबूची काठी उचलली आणि वाघाच्या शेपटीवर मारली. वाघाने मुलीला खाली फेकत अर्चना यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पुन्हा पूर्ण ताकदीनिशी काठीने वाघावर हल्ला चढवला. यानंतर वाघाने घाबरून तिथून पळ काढला. वाघ जाताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मुलीला उचलून अर्चना गावाकडे धावत सुटल्या. यानंतर लगेचच पतीच्या मदतीने त्यांनी आपल्या मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या या चिमुरडीचा जीव धोक्याबाहेर आहे. आपली मुलगी सुखरूप असल्याने मेश्राम दाम्पत्याच्या जिवात जीव आला आहे.