मालेगाव (दि. १६)बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना काल मालेगावातील सोयगाव येथे घडली, नातीच्या नावाने दोन लाख रुपये ठेवावेत यासाठी सातत्याने पैशाचा तगादा लावणाऱ्या मुलाचा जन्मदात्या पित्यानेच तीक्ष्ण हत्याराने वार करत खून केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हितेश कृष्णा बाविस्कर (३४, रा.तिरुपती कॉलनी, दौलती शाळेजवळ) असे दुर्दैवी मयत तरुणाचे नाव आहे. दाभाडी रस्त्यावरील हॉटेलमध्ये हा खूनाचा थरार घडला.
कृष्णा बाविस्कर एसटी महामंडळाच्या नोकरीतून वाहक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांनी दुसरा विवाह केला. २०२० मध्ये सेवानिवृत्ती नंतर त्यांची दुसरी पत्नी ५ लाख रुपये घेवून निघून गेली. यानंतर त्यांनी सोयगाव भागातील सुलोचना अहिरे हिच्याशी घरोबा केला. तिचा मुलगा अजयला चारचाकी घेण्यासाठी पैसे दिले. हितेश वडीलांकडे सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून काही पैसे नात परिधी हिच्या नावे ठेवण्याची विनंती करीत होता. यातून हितेश व वडीलांमध्ये भांडण होत होते. नातेवाईकांनाही हा प्रकार माहिती झाल्यानंतर वडिलांनी हितेशला अक्षयतृतीयेला २ लाख रुपये देण्याचे कबूल केले. मयत हितेश १५ मेस पैसे घेण्यासाठी गेला असता वडीलांसह तिघांनी त्याला शिवीगाळ करून हाकलून दिले. रविवारी सायंकाळी हितेश पुन्हा वडिलांकडे गेला. रात्री दहापर्यंत तो घरी आला नाही. त्याचवेळी शेजारील मुलीने हितेशला मारहाण झाल्याचे त्याच्या पत्नीला सांगितले. हितेशची पत्नी, तिचा भाऊ व वडील सामान्य रुग्णालयात गेले असता हितेश मयत झाला होता. त्याच्या डोक्यावर, हातावर तीक्ष्ण हत्याराने वार आढळून आले. यानंतर मानवीने सासऱ्यासह तिघांविरुध्द तक्रार दाखल केली. छावणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे
मयत तरुणाला दोन लहान मुले असून मुलगा 3 व मुलगी 4 वर्षाची असल्याची कळते, या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे