मानके या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
*मालेगाव, दि. 31 :- भारतीय लष्करातील 21 पॅराट्रूप स्पेशल फोर्स मध्ये कार्यरत असलेले शहीद जवान मनोराज शिवाजी सोनवणे हे अरुणाचल प्रदेशात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असतांना तेथील उंच प्रदेशातील प्रतिकुल वातावरणामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शहीद जवान मनोराज शिवाजी सोनवणे यांच्यावर सायंकाळी 06:00 वाजता त्यांच्या मुळगावी मानके पोस्ट चिखलओहोळ ता.मालेगांव जिल्हा नाशिक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील मानके या गावचे मुळ रहिवासी मनोराज सोनवणे हे 16 वर्षापासून भारतीय लष्कारातील 21 पॅराट्रप या स्पेशल फोर्स मध्ये कमांडो पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नि जयश्री सोनवणे, मुलगा तुषार सोनवणे, मुलगी तनू सोनवणे असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव मानके येथे आणल्यानंतर तेथे लष्कराच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. शनिवारी मानके गाव व पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपल्या परिसरातील लाडक्या जवानाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी गावकऱ्यांनी 'भारत माता की जय' 'अमर रहे' यासारख्या घोषणा देऊन शहीद जवानाला सायंकाळी 06:00 वाजता अखेरचा निरोप दिला.