देवळा, दि. १३ डिसेंबर २०२३ - देवपुरपाडे येथे शेतकरी तथा मेंढपाळ व्यवसायिक श्री. संजय त्रंबक आढाव यांच्या गट नं. ३३/३ येथे मेंढ्यांचे कळप होते. आज दिवसभर जंगलात मेंढ्या चारून सायंकाळी शेतातील वाड्यामध्ये बंद करुन ठेवले. नंतर सायंकाळी अचानक बिबट्याने मेंढ्यावर केलेल्या हल्ल्यात एका मेंढीचा मृत्यू झाला. वेळीच तेथे वाडयावर मेंढ्या राखण्यासाठी उपस्थित असलेले मेंढपाळ किरण संजय आढाव यांनी प्रसंगावधान राखत बिबट्यास पळवून लावत लाखोंचे नुकसान होण्यापासून रोखले.
मेंढपाळ किरण आढाव यांनी सांगितले की, आज सायंकाळी पाचच्या सुमारास मेंढ्यांचे कळप वाड्यात बंद करुन मी घरी आलो होतो. काही वेळाने मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. मी वाड्याकडे धावलो असता बिबट्याने एका मेंढीवर हल्ला केला होता. मी आरडाओरडा केला आणि बिबट्याला पिटाळून लावले.
या घटनेची माहिती देवळा वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वनविभागाचे प्रमुख डोमसे साहेब यांनी मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.