जळगाव, दि.15 नोव्हेंबर 2023: जळगाव जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती जळगाव येथील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या अधिकाऱ्यांनी एका तक्रारदाराला त्यांच्या विरुद्ध चालू असलेल्या चौकशीतून दोषमुक्त करण्यासाठी 5 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे.
पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये रवींद्र शालिग्राम सपकाळे (वय 54, विस्तार अधिकारी ( चार्ज सहाय्यक गट विकास अधिकारी वर्ग २) पंचायत समिती जळगांव जि.जळगांव) आणि पद्माकर बुधा अहिरे (वय 53, विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव,( वर्ग ३ )) यांचा समावेश आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुद्धा लोकसेवक असून त्यांच्या विरुद्ध चालू असलेल्या चौकशी समितीमध्ये सपकाळे आणि अहिरे हे प्रमुख असून या चौकशी मधून तुम्हाला दोष मुक्त करतो तुमचा अहवाल चांगला पाठवितो त्यासाठी आम्हाला 5,00,000 रुपये द्यावे लागतील. अशी लाचेची मागणी सपकाळे आणि अहिरे यांनी तक्रारदाराला केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सपकाळे आणि अहिरे यांना तक्रारदाराला 5 लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले आहे.
या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, , पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. प्रणेश ठाकुर यांनी ही कारवाई करुन सापळा यशस्वी केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
दुरध्वनी क्रं. 0257-2235477
मोबा.क्रं. 8806643000
टोल फ्रि क्रं. 1064
==================