राकेश आहेर:- (देवळा)
देवळा तालुक्यातील उमराणे, मेशी, हणुमंतपाडे येथे नुकत्याच देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्यासह त्यांच्या पथकामार्फत गावठी दारूच्या हातभट्टया उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यात सर्वत्र गावठी दारू तयार करण्याचे तसेच दारु व गुटखा विक्री करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे तरुण वर्ग व्यसनाधीन होऊन वेगवेगळ्या मार्गाला जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन देवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी अवैध धंद्यांनविरोधात आपली कंबर कसली असून अवैध धंद्याची माहिती मिळताच त्याच क्षणी धडक कारवाईस सुरुवात केली असून गावठी दारूच्या हातभट्टयानवर गुपीत माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह छापे टाकत अनेक ठिकाणच्या गावठी दारूच्या हातभट्टया उध्वस्त केल्या आहेत. अचानक पडलेल्या धाडीमुळे दारु बनविणाऱ्या संबंधितांनी तेथुन पळ काढला असला तरी दारु बनविण्याचे लाखों रुपयांची रसायने तसेच साहित्य देवळा पोलिसांनकडुन नष्ट करण्यात आले आहेत.
दारु गुटख्यामुळे तरुण वर्ग व्यसनाधीन होत चालला आहे. यामुळे अशा अवैध धंद्यांना लगाम लागणे गरजेचेच आहे. सर्वसामान्यांकडून या कारवाईंचे स्वागत करण्यात आले आहे.